
प्रथमेश गडकरी
नवी मुंबईतील खारघरमध्ये सध्या पाण्याची भीषण समस्या जाणवत आहे. कोट्यवधींची आलिशान घरे असूनही, येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सिडकोच्या नियोजनशून्य आणि अनागोंदी कारभारामुळे खारघर सेक्टर 34 आणि 35 मधील सोसायट्या अक्षरशः तहानलेल्या आहेत असा आरोप होत आहे. खारघरमधील सेक्टर 34 आणि 35 हा उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, येथील अनेक घरांची किंमत दीड कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
असं असलं तरी पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. सोसायट्यांमधील रहिवाशांना टँकरसाठी महिन्याला दीड ते दोन लाख रुपये खर्च येत आहे. सिडकोकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा असून, याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. काही सोसायट्यांनी यावर तोडगा म्हणून स्वतः बोअरवेल खोदल्या आहेत. मात्र त्यातील पाणीही पिण्यायोग्य नसल्याने, त्यांना नाइलाजाने टँकरचा आधार घ्यावा लागत आहे, असं हॅना ख्रिश्चन यांनी सांगितलं. त्या खारघरच्या ओव्हल सोसायटीच्या अध्यक्ष आहेत.
सिडकोकडून पुरवठा करण्यात येणारे पाणी गढूळ आहे. त्याला घाण वास येत असल्याची तक्रार रहिवासी करत आहेत. या पाण्याच्या वापरामुळे अनेक त्वचा रोग आणि केस गळतीसारखे प्रकार घडत असल्याचेही रहिवासी सांगत आहेत. खारघरमध्ये पाणीपुरवठा करणारी यंत्रणा सिडकोच्या अखत्यारीत येत असल्याने, येथील रहिवाशांनी सिडकोकडे अनेकदा तक्रार नोंदवली आहे. परंतु, सिडकोकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. खारघरसारख्या विकसनशील भागात भविष्यात चांगल्या सुविधा मिळतील, या आशेने राहायला आलेल्या नागरिकांची स्वप्ने, हे पाण्याचे दुर्भिक्ष पाहून विरून गेल्यासारखी झाली आहेत.
खारघर हे पनवेल महापालिका हद्दीत येत असल्याने याबाबत सोसायटीतील रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेकडेही पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. परंतु, खारघर भागात पाणीपुरवठा करण्याचे काम सिडकोच्या अखत्यारीत येत असल्याने, सिडकोच यावर तोडगा काढू शकते, असे सांगून पनवेल महानगरपालिकेनेही हात झटकल्याचे रहिवासी सांगत आहेत. या गंभीर परिस्थितीवर सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, हेटवणे पाणीपुरवठा योजनेचे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर पाण्याची समस्या सुटेल, असे आश्वासन दिले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Mhada News: म्हाडाचा भोंगळ कारभार! लॉटरीमध्ये फ्लॅट लागला पण बिल्डरने परस्पर विकला
खारघरमधील नागरिकांना सिडकोच्या आश्वासनावर किती विश्वास आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, सध्या तरी येथील नागरिक पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी झगडत आहेत, हे वास्तव आहे. मे महिना जवळ आला आहे, त्यात खारघरमधील पाण्याचे हे दुर्भिक्ष दिसून येत आहे. यामुळे एकीकडे रहिवाशांचा संताप होत असताना दुसरीकडे टँकर माफियांना या पाणी कपातीचा फायदा पोहोचवण्यासाठी तर हे सर्व केले जात नाही ना? असाही सवाल येथील रहिवासी विचारत आहेत. शहराच्या नियोजनबद्धतेचा आणि विकासाचा दावा करणारे सिडको प्रशासन, खारघर येथील रहिवाशांना पाणी पुरवण्यास अपयशी ठरल्याचे नागरिक सांगत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world