
राहुल कांबळे, नवी मुंबई
ऐन पावसाळ्यात नवी मुंबईकरांना आता पाणीकपातीचा फटका बसणार आहे. नेरुळ सेक्टर-४६ येथील अक्षर बिल्डिंगजवळ मोरबे धरणातून येणाऱ्या १७०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमध्ये वारंवार होणाऱ्या गळतीमुळे महानगरपालिकेने अखेर नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जुनी आणि नवीन जलवाहिनी एकमेकांशी जोडण्याचे काम १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असून हे काम १९ जुलै रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
या दरम्यान १८ तास पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या नोड्समधील नागरिकांना पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. याशिवाय, मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडणी असलेले परिसर तसेच सिडकोच्या खारघर व कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही खंडित होणार आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Alchohol Price: 'बार' चा संप तीव्र होणार? आता वाईन शॉपवालेही टाळी देणार)
कशी असेल पाणी कपात
१८ जुलै संध्याकाळचा व १९ जुलै सकाळचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तर १९ जुलै संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. महापालिकेचे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे व जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
महानगरपालिकेच्या जलपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यातच हे काम घेण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांत या मुख्य जलवाहिनीत वारंवार गळती झाल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत होता. त्यामुळे ही दुरुस्ती अत्यावश्यक होती. दरम्यान, नागरिकांनी या काळात पाण्याचा योग्य वापर करावा, अनावश्यक नळ सुरु ठेवू नयेत आणि शक्य असल्यास पाणी साठवून ठेवण्याचे नियोजन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world