जाहिरात

Mhada News: म्हाडाचा भोंगळ कारभार! लॉटरीमध्ये फ्लॅट लागला पण बिल्डरने परस्पर विकला

या सदनिकेते क्षेत्रफळ टू बीएचके दर्शवण्यात आले होते. मात्र इतर सदनीकांच्या तुलनेत याची किंमत जास्त असल्याचे समजले.

Mhada News: म्हाडाचा भोंगळ कारभार! लॉटरीमध्ये फ्लॅट लागला पण बिल्डरने परस्पर विकला
पुणे:

म्हाडाच्या लॉटरीमध्ये फ्लॅट लागला मात्र बिल्डर आणि म्हाडा अधिकाऱ्यांने संगणमत करून परस्पर तो फ्लॅट विकण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पत्रकार कोट्यातून म्हाडाच्या लॉटरीमध्ये विजेता ठरलेले अनिल पौलकर यांनी आपल्याला लागलेला फ्लॅट म्हाडा अधिकारी अन बिल्डरने संगणमत करून परस्पर विकल्याचा आरोप केला आहे. पौलकर यांनी ही माहिती पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. म्हाडाच्या या भोंगळ कारभारामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. म्हाडा पुणे मंडळाकडून 2023 ला लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीत पौलकर यांनी पत्रकार कोट्यातून अर्ज दाखल केला होता. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील किवळे येथील विजन क्रिएटिव्ह ग्रुपच्या विजन अरिष्ट या गृह संकुलातील सी -104 या क्रमांकाची सदनिका त्यांना या लॉटरीमध्ये लागली होती. याबाबतचे देकार पत्र देखील देण्यात आले होते. देकार पत्रावर सदनिकेची किंमत 38 लाख 99 हजार 700 इतकी दर्शवण्यात आली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या सदनिकेते क्षेत्रफळ टू बीएचके दर्शवण्यात आले होते. मात्र इतर सदनीकांच्या तुलनेत याची किंमत जास्त असल्याचे समजले.  त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गृहसकुलांच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी म्हाडाच्या लाभार्थ्यांनी अगोदर पैसे भरल्याशिवाय पाहणी करता येणार नाही, असे पौलकर यांना सांगण्यात आले. तसेच सीट आऊटमुळे फ्लॅटचे क्षेत्रफळ वाढले, त्यामुळे किंमत वाढल्याचे ही त्यांना सांगण्यात आले. बिल्डर संपूर्ण माहिती देत नसल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम इमारत परवानगी विभागातून माहिती अधिकारामार्फत कागदपत्रे काढली. त्यात फ्लॅटचे क्षेत्रफळ म्हाडा आणि यु डी सी पी आर च्या प्रचलित नियमांना डावलून अनावश्यकरीत्या वाढवलेले दिसून आले, असा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर वाढवलेल्या किंमतीबद्दल म्हाडाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे 4 जुलै 2023 रोजी पहिली तक्रार दिल्याचे पौलकरांनी सांगितले.

ट्रेंडिंग बातमी - 'जिन्नांनाही लाजवेल अशी मुस्लीम समाजाची बाजू घेणारी भाषणं...'; उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन थेट सवाल

पहिल्या मजल्यावरील जे फ्लॅट बाजारात सहजरित्या विकले जात नाहीत, ते फ्लॅट प्लॅनिंग ऍथॉरिटी असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकारी, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून म्हाडा लाभार्थ्यांच्या माथी मारायचे. त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळायचे, असा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच म्हाडाच्या परवडणारे घरे आणि सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यासारखे असल्याचे तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे.म्हाडा अधिकारी आणि बिल्डरवर आरोप केला असून त्यांच्या म्हणण्यानुसार बिल्डर आणि म्हाडा अधिकाऱ्यांनी परस्पर संगणमत करून मला अंधारात ठेवले. म्हाडाच्या सोडतीमध्ये लागलेल्या माझा फ्लॅट परस्पर विकला आहे असं ही पौलकर म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Eknath Shinde: 'मला एसंशिं म्हणतात मग मी त्यांना UT म्हणजे युज अँड थ्रो बोलू का?' शिंदे भडकले

यासंदर्भात मी म्हाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे अर्ज केला आहे.  त्यानंतर बिल्डर आणि मला दोघांनाही विचारणा केली असता हा फ्लॅट नोव्हेंबर 2024 मध्येच रवींद्र क्षीरसागर नावाच्या व्यक्तीला विकून टाकल्याची माहिती बिल्डरने दिली. यावेळी म्हाडाचे सीईओ राहुल साकोरे व इतर अधिकारी उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, झालेल्या प्रकाराबद्दल म्हाडा अधिकारी यांनी तुमचा फ्लॅट तुम्हाला परत मिळेल असे सांगितले. मात्र पुढे काहीच झाले नाही. यासंदर्भात पौलकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून या संदर्भात आता पोलिसात देखील तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. म्हाडा पुणेचे अध्यक्ष असलेले शिवाजी आढळराव पाटील व इतर संबंधित अधिकारी या प्रकरणी आता काय तोडगा काढतात किंवा काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.