
सुरज कसबे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये 2017 मधीलच प्रभाग रचनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येते आहे. ही प्रभाग रचना भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल असल्याची चाहूल लागतच शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने आपण या प्रभाग रचनेबाबत हरकती घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निवडणूकपूर्वीच शहरात महायुतीत संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहर अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातो. या महानगरपालिकेवर गेले अनेक काळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता राहिली आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये चार सदस्य प्रभाग पद्धती आखण्यात आली. त्यानुसार 32 प्रभागांमध्ये 127 नगरसेवक होते. या चार सदस्य प्रभाग रचनेचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला. भाजपची एक हाती सत्ता महानगरपालिकेवर आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला विरोधी पक्षात बसावं लागलं.
नक्की वाचा - Pune News: पुण्याच्या 'या' डॉक्टरांचे चाहते झाले आनंद महिंद्रा, कारण ही आहे खास
दरम्यान ही प्रभाग रचना 2017 ची पुनरावृत्ती आहे. याबाबत आम्ही हरकती घेणार आहोत, आमच्या जागा यावेळी 100 पेक्षा जास्त येतील. 2017 च्या वेळी थोडी गडबड झाली होती. याची सल आजही आमचे नेते अजित पवारांच्या मनात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांनी म्हटलं आहे. तर प्रसिद्ध करण्यात आलेली प्रभाग रचना ही अत्यंत योग्य असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत आहेत. तुम्ही अगोदर लोकांपर्यंत पोहोचा असा सल्ला भाजपचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांना देत आहेत.
Thane Metro ठाणे मेट्रोची प्रतीक्षा संपली! 'या' 10 स्टेशनवरून धावणार मेट्रो, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन कोणतं?
तुम्ही जर लोकांचा विश्वास जिंकला नाही तर तुमचा काहीही उपयोग नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी डिवचले आहे. तर या प्रारूप प्रभाग रचेनेबाबत 4 सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना नोंदविण्यात येणार आहेत. त्यानंतर आलेल्या हरकती आणि सूचनांवर 5 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार आहे. यानंतर ही प्रारूप प्रभाग रचना 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान शासनाला पाठवून अंतिम केली जाणार आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हरकत घेतल्यास त्याचा कितपत फायदा आगामी पालिका निवडणूकमध्ये होतो हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world