इंदापुरात शरद पवारांचा अजित पवारांना धक्का; विधानसभेत राजकीय गणितं बदलणार

Pune Politics : लोकसभेच्या निवडणुकीवेळी प्रवीण माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र याच दरम्यान अचानक प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, इंदापूर

पुण्याच्या इंदापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीमध्ये असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने हे उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून प्रवीण माने यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. विधानसभेचा शब्द शरद पवारांनी माने  कुटुंबाला दिला असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. यानंतरच हा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. पुणे शहरातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

लोकसभेच्या निवडणुकीवेळी प्रवीण माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र याच दरम्यान अचानक प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी प्रवीण माने यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह भाजपचा मोठा दबाव असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता हेच प्रवीण माने अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार आहेत. त्यामुळे इंदापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

(नक्की वाचा - बंडखोरी अटळ? भाजपचा बडा नेता कामाला लागला,दादांचे टेन्शन वाढले)

Pravin Mane

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इंदापूर विधानसभेसाठी चाचपणी सुरू आहे. यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांचंही नांव शर्यतीत आहे. शरद पवार इंदापूर विधानसभेसाठी आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने दोघांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे अद्याप तरी गुलदस्तात आहे.

(नक्की वाचा -  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर; देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?)

इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तगडा उमेदवार दिल्यास इंदापूरमध्ये राजकारणाची गणितं बदलणार असून सध्याच्या परिस्थितीत इंदापूरमध्ये तिरंगी लढत होईल असे चित्र आहे. एकीकडे शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा असून दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्षाची तयारी केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रय भरणे हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत.

Advertisement