रामराजे शिंदे, नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वादाची ठिणगी पडली असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये सध्या तीव्र नाराजीचा सूर आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांची थेट दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावण्याच्या चर्चा सध्या वेगाने सुरू आहेत. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्या मंत्रिपदाच्या चर्चांमुळे पक्षासाठी वर्षानुवर्षे घाम गाळणारे ज्येष्ठ नेते स्वतःला बाजूला सारले गेल्याच्या भावनेत आहेत.
आयुष्यभर पक्षासाठी काम करणाऱ्यांना डावलले
पक्षातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संभाव्य मंत्रिपद वाटपामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ नेत्यांच्या गोटातून नाराजी व्यक्त होत आहे. पक्षाला कठीण काळात सांभाळणारे, अनेक निवडणुकांचा दांडगा अनुभव असणारे आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाचा चेहरा बनू शकतील अशा अनुभवी नेत्यांचा विचार केंद्रीय मंत्रिपदासाठी केला जात नसल्याचा आरोप होत आहे.
(नक्की वाचा- MPSC च्या पूर्व परीक्षा होणार ऑनलाईन, 21 दिवसांत निकाल; मात्र विद्यार्थ्यांचा विरोध का?)
ज्या नेत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि तळागाळात पक्ष पोहोचवण्यासाठी घालवले, त्यांना डावलून केवळ घराणेशाहीच्या जोरावर थेट दिल्लीत मंत्रिपद दिले जात आहे," अशी खंत काही ज्येष्ठ नेत्यांनी खासगीत बोलून दाखवली आहे.
(नक्की वाचा- Accident Time: सावधान! रात्रीचा 'हा' एक तास प्रवासासाठी सर्वात धोकादायक; रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर)
पार्थ पवारांच्या दिल्लीतील एन्ट्रीमुळे पक्षांतर्गत समीकरणे बदलणार?
काही दिवसांपूर्वीच शासकीय निविदा आणि पुणे महानगरपालिकेतील नियुक्त्यांवरून पक्षात जुन्या विरुद्ध नव्या नेतृत्वामध्ये विसंवाद पाहायला मिळाला होता. तो वाद शांत होत नाही तोच, आता पार्थ पवार यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या हालचालींमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या अंतर्गत नाराजीवर पक्षाचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.