MNS News : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात यावी, अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्रात वाद सुरू झाला. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उडी घेतली आहे. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या मागे कदाचित ‘महाशक्ती' तर नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे.
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. पक्षाला विविध प्रकारे इशारे दिले जात आहेत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बंधू राजसाहेब, मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावगं आहे. कारण याआधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत. तुम्ही एकदा तपासून घ्यावे, मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती' तर नाही, अशी शंका रोहिणी खडसे यांनी उपस्थित केली.
(नक्की वाचा- Rohit Pawar : विधानसभेतील मविआच्या कामगिरीवरुन रोहित पवारांची नाराजी, म्हणाले...)
काय आहे प्रकरण?
मराठी न बोलणाऱ्या लोकांना मारहाण करणे, त्यांच्या विषयी द्वेषपूर्ण भाषा बोलणे, दमदाटी करणे, यामुळे मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी. तसेच राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या मागणीला घेऊन सर्वोच्च न्यायालयात उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याचिका दाखल केली आहे. तसेच यासंबंधी निवडणूक आयोग, गृहमंत्रालय यांना देखील पत्र पाठवण्यात आले आहे.
(नक्की वाचा- "एकतरी सीट निवडून आणून दाखवा", परप्रांतीयाने डिवचलं; संदीप देशपांडे संतापले)
राज ठाकरे हे हिंदू विरोधी आहेत. तसेच ते मराठी विरोधीही आहेत. ते संविधानाचे विरोधक आहेत, त्यामुळे मनसे संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्यांना ज्यांना मारहाण केली आहे ते सगळे हिंदू आहेत. त्यामुळे आम्ही राज ठाकरेंच्या विरोधात उभे आहोत, असं उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी म्हटलं होतं.