राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र अजित पवार हयात असतानाचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरु होती. यासाठी दोन्ही बाजूच्या नेत्यामध्ये बैठका देखील झाल्या होता. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देखील याबाबत माहिती होती.
किती बैठका झाल्या होत्या?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी तब्बल 14 बैठका झाल्या होत्या. अजित पवार यांनी या बैठका घेतल्या होत्या. 8 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे जाहीर केले जाणार होते. बैठकांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देखील माहिती देण्यात आली होती.
(नक्की वाचा- NCP Merger News: राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून मतभेद; अजित पवारांच्या 'या' नेत्यांना विरोध)
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही पक्ष एकत्रिकरणाची घोषणा करण्याचा निर्णय झाला होता, म्हणून उमेदवारांना तुतारी ऐवजी घड्याळावर लढवण्याचा निर्णय घेतला गेला. राष्ट्रवादी पक्ष एकत्रिकरणासाठी अजित पवार यांच्या जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यात 14 बैठका पार पडल्या होत्या. अंतिम बैठकीनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांना भेटून बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली होती. विश्वसनीय नेत्याने याबाबतची माहिती दिली आहे.
शरद पवारांना घेतली होती जबाबदारी
त्या भेटीत शरद पवार यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्यास हिरवा कंदील दिला होता. त्यानंतरच तुतारी ऐवजी उमेदवारांनी घड्याळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार यांनी कुटूंब प्रमुख म्हणून दोन्ही पक्ष एकत्र करण्याची जबाबदारी घेतली होती. या संदर्भात पूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली होती.
(नक्की वाचा- Ajit Pawar: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार? कुटुंबातील 3 आणि कुटुंबाबाहेरील 3 नावे चर्चेत)
शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार कायम ठेवून अजित पवार यांनी महायुतीत काम करून दाखवलं होतं. तोच विचार कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढं घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात कायदेशीर सल्ला देखील घेण्यात आला होता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि पक्षाच्या भवितव्यासाठी आपण एकत्र यावं अशी भावना अनेक नेत्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांना या अगोदरच बोलून दाखवली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.