राहुल कुलकर्णी, पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आज पवार कुटुंबियातही फूट पडल्याचं दिसून आलं. दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येतात, अशी आजवरची परंपरा आहे. मात्र आज गोविंदबागेत शरद पवार आणि काटेवाडीमध्ये अजित पवार अशा दोन दिवाळी पाडव्यांचा कार्यक्रम दिसून आला. अजित पवारांनी गोविंदबागेत न येत काटेवाडीत दिवाळी पाडवा साजरा केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुप्रिया सुळे यांनी यानिमित्त एनडीटीव्ही मराठीसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, दिवाळी पाडवा 1967 पासून साजरा केला जात आहे. आज 57 वर्ष झाली. शरद पवार आमदार झाले तेव्हापासून ही परंपरा सुरु आहे. असा हा कौटुंबिक कार्यक्रम आहे. माझ्या वडिलांच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी दिवस हा असतो, असं मला वाटतं.
(नक्की वाचा- 'निवडणुकीत पैसे पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर' शरद पवारांचा पाडव्यालाच बॉम्ब)
ते फोन उचलत नाहीत
अजित पवारांच्या काटेवाडीतील दिवाळी पाडव्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहेत. दिल्लीच्या अदृश्य शक्तीचं हे यश आहे. दिल्लीतील अदृश्य शक्तींनी काश्मीर टू कन्याकुमारी जसा सरकारी यंत्रणांचा वापर केला. ईडी, सीबीआय इनकम टॅक्स सारख्या यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे, त्याचं हे यश आहे. मी अजित पवारांना फोन करते मात्र ते फोन उचलत नाहीत. प्रत्येकाचा अधिकार आहे आणि मी सर्वांच्या संपर्कात असते.
(नक्की वाचा-- राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर कुटुंबातही फूट; पवार कुटुंबीयांची एकत्र दिवाळी पाडव्याची परंपरा खंडित)
अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत. बारामतीकर अजित पवारांना विकास पाहून विजयी करतील अशी चर्चा आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, बारामतीच्या यशात सर्वांच योगदान आहे. हे कुणा एकाचं यश नाही. कुणा एकाला हे शक्य नाही. अजित पवार यांचंही बारामतीच्या विकासात हात आहे. असंख्य कार्यकर्त्यांचा देखील यात सहभाग आहे. अनेकांनी कष्ट केले.
महागाई, बेरोजगारी राज्यातील मोठ्या समस्या आहेत. आज माझी आई सांगते की, महागाई आणि बेरोजगारीला आम्ही कंटाळलो आहेत. महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण गलिच्छ झालं आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे हीच परिस्थिती आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.