विधानसभा निवडणुकीत लढती कशा असतील याचे चित्र सोमवारी स्पष्ट होईल. त्यानंतर प्रचाराने वातावरण आणखी तापणार आहे. मात्र त्या आधीच शरद पवारांनी आरोपाचा एक मोठा बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पैसे पुरवले जात आहेत. हे पैसे पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्या वापरल्या जात आहेत. अशी माहिती एका अधिकाऱ्यानेच आपल्याला नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्याचं शरद पवारांनी सांगितलं. बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पवारांचा हा आरोप अत्यंत गंभीर आहे. अनेक जिल्ह्यातील अधिकारी हे आपल्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून आपल्याला समजले की सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना जे अर्थसहाय्य केले जात आहे, त्यासाठी पोलिसांच्या गाड्या वापरल्या जात आहेत. याबाबत आपण जाहीर पणे बोलणार होतो. मात्र ज्या अधिकाऱ्यांने मला ही माहिती दिली, त्याने आपल्याकडून कमिटमेंट घेतली होती. आपले नाव यात कुठेही यायला नको अशी त्यांची अपेक्षा होती. भविष्यात त्यांच्यावर कोणते संकट नको म्हणून त्यांनी कमिटमेंट घेतली असेही पवारांनी सांगितले.
यावेळी रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीबाबतही शरद पवारांनी आपली भूमीका स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या गृहखात्याची मला व्यवस्थित माहिती आहे. अतिशय उत्तम अधिकारी, पोलीस दलाचे प्रमुख हे महाराष्ट्राच्या पोलिस दलाचे वैशिष्ट्य होते. महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्याच्या पोलीस प्रमुखा विषयी जाहीरपणे राजकीय पक्ष काही मागण्या करायला लागले आहेत. ही स्थिती कधीही आली नव्हती. ज्या व्यक्तीसंदर्भात हे भाष्य केले जात आहे, त्यांनी काय उद्योग केले आहेत, याची अनेक वेळा चर्चा झाली आहे. यात सखोल चौकशी करून सत्य बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारची होती. सरकारने ती जबाबदारी पार पाडली नाही. मात्र त्यांना एक्स्टेन्शन देण्याचे काम केले. याचा अर्थ या यंत्रणा कशा रितीने वागतात याची नीती सध्याच्या सरकारने ठरवलेली दिसते. असं पवार यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - "एकनाथ शिंदे संकुचित विचारांचे", मनसेची माहीमच्या जागेवरून टीका
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यावरही शरद पवार स्पष्ट पणे बोलले. गृहमंत्र्याला सुरक्षा ही असतेच. त्याशिवाय अधिकच्या सुरक्षेची त्यांना गरज लागते. याचा अर्थ हा विषय गंभीर असण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची अधिक माहिती मिळाल्याशिवाय मी अधिक भाष्य करणार नाही. असे ते म्हणाले. गृहमंत्र्यालाच संरक्षण घ्यावे लागत असेल तर ते गंभीर आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातमी - "उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी काँग्रेससोबत युती केली", एकनाथ शिंदेंचा घणाघात
दरम्यान महिलांबाबत बोलताना प्रत्येकाने सांभाळून बोलले पाहीजे असे शरद पवार यावेळी म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते. जे सावंत यांनी वक्तव्य केले ते वैयक्तीक नव्हते. त्यांच्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. पण निवडणुका लक्षात घेवून त्यांच्यावर कारवाई केली गेली. सर्व यंत्रणा कामाला लागल्या. हा राजकारणाचा भाग आहे असेही ते म्हणाले. पण महिलांबाबत बोलताना थोडं जपून बोलले पाहीजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world