राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनावर नेत्यांनी भूमिका मांडावी, अशी मागणी आंदोलक आणि विरोधी पक्षांकडून होत आहे. राज्यातील सामाजिक परिस्थिती बिघडू नये यासाठी राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा अशीही मागणी होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (राशप) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
राज्यात 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही, असा न्यायालयाचा निर्णय आहे. यासाठी सर्वांनी मिळून केंद्र सरकारकडे आपली भूमिका मांडली पाहिजे. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडावी लागेल. हे धोरण बदलावं लागेल. याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. केंद्र सरकारने भूमिका घेतल्यास त्याला आमचं समर्थन असेल, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. दोन समाजामध्ये द्वेष निर्माण होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज वेळीच काळजी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी चिंता देखील शरद पवार यांनी व्यक्त केली.
(नक्की वाचा- भुजबळांचं ओपन चॅलेंज जरांगेंनी स्वीकारलं; विधानसभा निवडणुकीची सर्वात मोठी अपडेट)
यावर तोडगा काढण्यासाठी माझी आणि मुख्यमंत्र्यांची याआधी बैठक झाली होती. त्यावेळी मी सूचवलं होतं की, सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्या बैठकीत त्यांना योग्य वाटेल त्यांना निमंत्रित करावं. विरोधी पक्ष म्हणूनही आम्ही देखील हजर राहू आणि आमची भूमिका सहकार्याची राहिल. मनोज जरांगे पाटील यांना देखील बोलवावं. ओबीसी नेत्यांनाही निमंत्रित करावं. त्यात आपण चर्चा करुन मार्ग काढू, असं शरद पवार यांनी सांगितलं होतं.
राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर
राज ठाकरेंनी दोन-तीनदा माझे नाव का घेतलं हे मला कळलं नाही. मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र ओळखतो. मी सुद्धा फिरतो, मलाही अडवलं मी निवेदन स्वीकारतो. आता हे देखील पवारांनीच केलं का ? मला अडवा, मला निवेदन द्या. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे कोणाला समर्थन द्यावं, निवडणूक लढवावा. यात चुकीचे काय आहे.
(नक्की वाचा - महायुतीत खडाजंगी होणार? अजित पवारांनी सार्वजनिकरित्या जाहीर केला पहिला उमेदवार!)
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभद नाहीत. आम्ही कोणत्याही अपेक्षेत नाही. ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, त्यावर शरद पवारांनी म्हटलं, ठीक आहे त्यांनी सांगितलं. ते जबाबदार घटकपक्ष आहेत सहकारी आहे त्यांचे मत दुर्लक्षित करण्यासारखे नाही.