आगामी विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आतापासूनच उमेदवार जाहीर केले जात असून त्यामध्ये आता महायुतीने आघाडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार काल कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. कागल येथे रविवारी पार पडलेल्या मेळाव्यावेळी येथील जनतेला आवाहन करताना अजित पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना इतक्या विक्रमी मतांनी निवडून द्या की, समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
दरम्यान कागलमधून भाजप नेते समरजीत घाटगे इच्छुक असतानाचा अजितदादांनी हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर समरजीत घाटगे आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवार घाटगेंना आपल्या पक्षात घेणार असल्याच्या चर्चांचा उधाण आलं होतं. तर आता अजितदादांनी मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर समरजीत घाटगे शरद पवार गटात जाऊन मुश्रीफांना थेट आव्हान देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
अजितदादांकडून कागलमधून मुश्रीफांची उमेदवारी जाहीर
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्यात काढलेल्या त्यांच्या नवनिर्माण यात्रेवेळी चार उमेदवार जाहीर करीत विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतल्याचे चित्र असताना आता अजित पवार यांनी त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करीत निवडणुकीत आघाडी घेतल्याचे दिसत आहे. राज्यातील महायुतीकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाने जाहीर केलेली ही पहिलीच उमेदवारी आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर हसन मुश्रीफांनी अजित पवारांची साथ दिली होती. त्यामुळे त्यांनी आजच्या मेळाव्यात त्यांच्या नावाची घोषणा केली.
नक्की वाचा - कोविडच्या रुग्णांना जिवंत दाखवून पैसे उकळले; भाजप आमदार जयकुमार गोरेंविरोधात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जुलै 2023 मध्ये उभी फुट पडली होती. फुटीनंतर अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेत सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी मुश्रीफांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या सोबत राहिले होते. मुश्रीफ हे पवार कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे नेते मानले जातात. आगामी काळात होणारी ही विधानसभेची निवडणूक हसन मुश्रीफांची सातवी निवडणूक असणार आहे. या आधीच्या सहापैकी पाच वेळा ते विजयी झाले आहेत. युती सरकारच्या वेळी पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या संजयबाबा घाटगे यांनी त्यांचा पराभव केला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world