Kalyan News: कल्याणमधील रिक्षाचालक महिला कोमल गायकवाड यांच्या संघर्षाची बातमी 'एनडीटीव्ही मराठी'वर प्रसिद्ध झाल्यानंतर, शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार, नगरसेवक महेश गायकवाड यांनी कोमल गायकवाड यांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली असून त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे.
'NDTV मराठी'च्या बातमीचा इम्पॅक्ट
संकटांशी दोन हात करत रिक्षामध्ये आपल्या तीन वर्षांच्या मुलीसाठी स्टँड तयार करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या कल्याणच्या कोमल गायकवाड यांची संघर्षमय कहाणी 'एनडीटीव्ही मराठी'ने मांडली होती. कल्याण पूर्वेतील भालगाव परिसरात राहणाऱ्या कोमल गायकवाड यांची जिद्द पाहून समाजमनातून कौतुक होत होते. पती गावी असल्याने घराची जबाबदारी आणि पदरात लहान मुलगी अशा परिस्थितीत त्यांनी रिक्षा चालवण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुलीला कोणाकडे ठेवायचे हा प्रश्न असल्याने त्यांनी रिक्षामध्येच एक विशेष स्टँड तयार केला, जेणेकरून मुलगी त्यांच्यासोबत सुरक्षित राहील.
(नक्की वाचा- Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?)
खासदार श्रीकांत शिंदेंची अमेरिकेतून दखल
एनडीटीव्ही मराठीची ही बातमी पाहिल्यानंतर सध्या अमेरिकेत दौऱ्यावर असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ दखल घेतली. श्रीकांत शिंदे यांनी कल्याणचे नगरसेवक महेश गायकवाड यांना कोमल गायकवाड यांना तातडीने मदत करण्याची सूचना केली. त्यानुसार गायकवाड यांनी कोमल यांना शिवसेना शाखेत बोलावून 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तसेच कोमल यांची मुलगी तेजस्वी हिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी शिवसेनेने उचलल्याची घोषणा महेश गायकवाड यांनी केली.
(नक्की वाचा- Chandrapur News: चंद्रपूर हादरलं! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसोबत भयंकर घडलं; रुग्णालय सील)
कोमल गायकवाड यांना अश्रू अनावर
मदतीचा धनादेश स्वीकारताना कोमल गायकवाड यांना भावना अनावर झाल्या. "कर्ज काढून रिक्षा घेतली होती आणि संसाराचा गाडा ओढताना मोठी कसरत होत होती. या मदतीमुळे माझ्या मुलीचे भविष्य आता सुरक्षित झाले आहे," अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नगरसेवक महेश गायकवाड यांनी काही जीवनावश्यक वस्तूही त्यांना यावेळी भेट दिल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world