Ashok Kharat Case Update: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन'याच्या विरोधात तक्रारींचा ओघ सुरूच आहे. आता सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर सातवा गुन्हा दाखल झाला आहे. करिअर घडवण्याच्या नावाखाली एका तरुणीवर संमोहनाद्वारे (Hypnotism) अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार या नव्या तक्रारीतून उघड झाला आहे.
नव्या तक्रारीतील धक्कादायक मुद्दे
"मी महादेवाचा अवतार आहे, माझ्यात प्रचंड दैवी शक्ती आहे," असे सांगून खरातने पीडित तरुणीचा विश्वास संपादन केला. तुझे करिअर उज्ज्वल करून देतो, असे आमिष त्याने तिला दाखवले होते.पीडितेच्या दाव्यानुसार, खरात तिला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्यायला द्यायचा. त्या पाण्याद्वारे किंवा विशिष्ट विधीद्वारे तिच्यावर संमोहन करून तिच्यावर नियंत्रण मिळवले जायचे. याच अवस्थेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
(नक्की वाचा- Pune News: अंडरग्राउंट मेट्रोच्या वर बोअर मारल्याचा प्रकार; महामेट्रोचं मोठं नुकसान, गुन्हा दाखल)
सहा महिने शोषण
हा अत्याचाराचा प्रकार जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांच्या काळात वारंवार घडला. पीडितेने जेव्हा या प्रकाराला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा "माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तुझा विरोध कायम राहिला तर मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करेन," अशी धमकी खरातने दिली होती. या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलिसांनी खरातवर गुन्हा दाखल केला आहे.
(नक्की वाचा- Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)
नाशिकमधील भोंदूगिरी आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने आता अत्यंत भयंकर वळण घेतलं आहे. अशोक खरात तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचं शोषणच करत नव्हता, तर त्याने 5 जणांचा नरबळी दिल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला जात आहे.
एसआयटीच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष
अशोक खरातची तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून सखोल तपासणी सुरु आहे. न्यायालयाने खरातच्या पोलीस कोठडीत 29 मार्चपर्यंत वाढ केली असून, त्याच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि जप्त केलेले लॅपटॉप तपासले जात आहेत.