
मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर करणारी मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद ही रो रो सेवा मार्च 2026 अखेर पर्यंत कार्यान्वित करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी मंत्री नितेश राणे यांनी या सूचना दिल्या आहेत. बैठकीस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दिघी आणि काशीद या दोन्ही ठिकाणच्या जेटीच्या कामांना गती देण्याच्या सूचना देऊन मंत्री राणे म्हणाले की, मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रो रो सेवा हा एक उत्तम पर्याय असणार आहे. या सेवेमुळे वेळेची ही बचत होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांना गती द्यावी. जेटीचे काम सुरू असतानाच इतर परवानग्यांचे प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी. मार्च 2026 अखेर पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करावीत.
दरम्यान यावेळी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थिती मच्छीमार नौकाना द्यावयाच्या डिझेल परतावा या विषयी बैठक झाली. यावेळी एकही पात्र मच्छीमार नौका डिझेल परतावा पासून वंचित राहणार नाही असे मंत्री राणे यांनी सांगितले. तसेच मच्छीमार संस्थानी त्यांच्या बोटी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी उपलब्ध करून द्याव्यात. या विषयी मच्छीमारांना समाधानकारक निर्णय घ्यावा, अशा सूचनाही राणे यांनी दिल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world