Mumbai News : धारावी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी होण्यासाठी 15 एप्रिल 2025 पर्यंत सादर केलेल्या कागदपत्रांची आता पडताळणी सुरू केली जाणार आहे. याआधी झालेल्या सर्वेक्षणात जे लोक सहभागी झाले नव्हते त्यांच्यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदत वाढवून दिली होती. ती अंतिम मुदत आता संपली आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना उपजिल्हाधिकारी तथा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे प्रमुख याविषयी म्हणाले की, “ज्या भागांमध्ये घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणांहून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे आम्ही आता परिशिष्ट-2 चा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु करणार आहोत. जे नागरिक सर्वेक्षणात सहभागी होण्यास इच्छुक नव्हते, त्यांची नोंद परिशिष्ट-2 च्या मसुद्यामध्ये ‘कागदपत्रे प्राप्त झालेली नाहीत' अशी केली जाणार आहे.”
(नक्की वाचा- Dharavi : धारावीतील वरच्या मजल्यावरील कुटुंबाला मिळणार लाभ, शपथपत्र मागविण्याबद्दल दिलं स्पष्टीकरण)
ज्या भागात अजूनही घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले गेलेले नाही त्या भागातच आता पुढचे सर्वेक्षण सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. “धारावी पुनर्विकास प्रकल्पातून कोणीही सुटू नये यासाठी काही भागात सध्या सर्वेक्षण सुरू आहे. प्रत्येकासाठी हक्काचे घर या भावनेतूनच हा प्रकल्प सुरू झाल्याने, कुणी या फायद्यांपासून वंचित राहू नये अशी सरकारची भूमिका आहे", असंही धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या प्रमुखांनी सांगितलं.
ताज्या आकडेवारीनुसार, सुमारे 1 लाख घर व गाळेधारकांची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली आहे. यापैकी सुमारे 94 हजार 500 घरे आणि गाळेधारकांना विशिष्ठ ओळख क्रमांक देण्यात आला आहे. तर, सुमारे 89 हजार घर आणि गाळेधारकांची नोंदणी ही लिडार तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटलरित्या करण्यात आली आहे. तसेच सुमारे 70 हजार घरांचे व गाळ्यांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
(नक्की वाचा - 'मिठागराच्या जमिनी विकासासाठी सुरक्षितच', धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण)
त्याचबरोबर सर्वेक्षणात सहभागी न झालेल्या धारावीकरांबद्दल बोलताना उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की, “धारावी पुनर्विकास प्रकल्पात नोंदणी करण्यासाठी इच्छुक नसलेल्या धारावीकरांनी इथून पुढे अनधिकृत गाळेधारक म्हणून ओळखले जाईल. इथून पुढे त्याचपद्धतीने त्यांची नोंद ठेवली जाईल.”