पुणे शहरात पाणीकपातीचे संकट ओढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र, पुणे महानगरपालिकेने (PMC) सोमवारी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सध्या शहरात कोणतीही तात्काळ पाणीकपात लागू करण्याचा विचार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जलसंपदा विभागाची मागणी काय होती?
'अल निनो'चा प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवत जलसंपदा विभागाने पुणे पालिकेला पाणीपुरवठ्यात 15% कपात करण्याचे आवाहन केले होते. ऑगस्टअखेरपर्यंत पाण्याचा साठा पुरवण्यासाठी जुलैच्या मध्यापर्यंतची ओढ कमी करण्याच्या उद्देशाने हे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, पालिकेने हा प्रस्ताव तूर्तास बाजूला ठेवला आहे.
महापालिका आयुक्तांची भूमिका
पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, "तातडीने पाणीपुरवठा कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव प्रशासनासमोर नाही. आम्ही धरणांमधील पाणीसाठा आणि दैनंदिन उपसा यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जर भविष्यात परिस्थिती बदलली, तरच त्यावेळचा निर्णय घेतला जाईल."
(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती
पाणीकपातीला विरोध करण्यासाठी पालिकेने धरणांमधील सध्याच्या साठ्याचा आधार घेतला आहे. आकडेवारीनुसार,सध्याचा साठा 11.5 टीएमसी (39%) असून गेल्या वर्षी हा साठा 10.4 टीएमसी (36%) होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1 टीएमसी अधिक पाणीसाठा असल्याने कपातीची गरज नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांची स्थिती सध्या समाधानकारक आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Bhendwal Bhakit: राज्यात पाऊस कसा असेल? राजकीय उलथापालथ होणार? भेंडवळच्या भाकितानं चिंता वाढली)
शहरातील अनेक भागांत आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. पाणीकपात हा कायमस्वरूपी उपाय नाही, त्याऐवजी वितरण व्यवस्था सुधारली पाहिजे, नागरिकांचं म्हणणं आहे. पाणीकपातीचा अंतिम निर्णय हा कालवा समितीच्या बैठकीत घेतला जातो. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही बैठक सध्या लांबणीवर पडली आहे. या बैठकीनंतरच पाण्याचा नेमका कोटा आणि भविष्यातील नियोजनाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world