
देशात रस्ते अपघातात दगावणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे यात स्त्रियांचे दगावण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. हे बाब एका शोधनिबंधातून समोर आली आहे. रस्त्यांची दुर्दशा, हेल्मेट वापराबाबत अनास्था आणि मद्यसेवन या गोष्टी अपघातासाठी कारणीभूत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील 2357 अपघातग्रस्तांवर उपचारातून डॉ अमित पडवळ यांनी हा शोधनिबंध सादर केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बार्शीतील भगवंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख न्यूरोसर्जन डॉ. अमित पडवळ यांनी 2357 रुग्णांच्या शास्त्रीय अभ्यासावर आधारीत शोधनिबंध तयार केला. बत्तीसाव्या राष्ट्रीय न्यूरोसर्जन व ट्रॉमा युनिट संचालकांच्या परिषदेत हा शोधनिबंध सादर करण्यात आला. त्यामध्ये त्यांनी अपघातांची विविध कारणे, रुग्णांना दाखल करतानाची स्थिती, रुग्णांचे अपघाता वेळी शरीरातील अमली पदार्थांचे प्रमाण, वाहन चालकांमधील स्त्री पुरुष प्रमाण,आसन पद्धत, रुग्णालयात दाखल करताना लागलेला कालावधी अशा विविध सूक्ष्म पातळ्यांवर अभ्यास करून हा अहवाल मांडला आहे.
ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांची सुरक्षा वाढवली; केंद्राकडून मिळाली झेड प्लस सुरक्षा, पण कारण काय?
डॉ. पडवळ यांनी ग्रामीण भागातील अपघातग्रस्तांचा अभ्यास करून मांडलेल्या या अहवालाचे परिषदेत कौतुक झाले. तसेच या परिषदेत बार्शी सारख्या ग्रामीण भागातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड न्यूरो ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून चांगली सुविधा देत असल्याचेही कौतूक झाले. त्यांनी दिलेल्या सेवेमुळे रुग्ण मृत्युदर हा पाच टक्के इतका कमी असल्याचेही दिसून आले आहे.
विकसनशील देशांमध्ये रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या भागांमध्ये तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरही निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाहन सुस्थितीमध्ये नसणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष, अशा विविध कारणांमुळे अपघात होताना दिसतात. असा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. सुस्थितीमध्ये नसलेल्या दुचाकींचा वापर, हेल्मेट वापराबाबतची उदासीनता, वाहन चालक व दुचाकीस्वारांमध्ये मद्यसेवनाचे प्रमाण,गतिरोधकांचे प्रमाण अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी या निबंधात म्हटले आहे.
जवळपास 96% अपघात हे दुचाकीच्या भरधाव चालवण्यामुळे होत असल्याचे दिसून आले आहे. 76% अपघातात डोक्याला ईजा होण्याचे प्रमाण आहे. स्त्रियांची दुचाकीवर बसण्याची चुकीची पद्धत बदलणे गरजेचे आहे असेही या अहवालात म्हटले आहे. अपघात कोणाच्याही जीवनामध्ये घडू शकतो. अशा अपघात प्रसंगी आपली संवेदनशीलता व मानवता धर्म यांचे पालन करणे गरजेचे आहे. अपघातग्रस्तांना तातडीने शक्यतो जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असं डॉ. अमित पडवळ यांनी सांगितलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world