
दिवाकर माने, प्रतिनिधी
Parbhani News : परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरालगतच्या पोहेटाकळी शिवारामध्ये राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे धडक देणारी गाडी मुंबईच्या उपजिल्हाधिकाऱ्याची (Mumbai Deputy Commissioner's car Accident) असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पाथरी शहरालगतच्या पोहेटाकळी शिवारामध्ये राज्य महामार्ग क्र.६१ वर काल १९ ऑक्टोबर, रविवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास एका इनोव्हा कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यात एक जण गंभीर तर एकजण जागीच ठार झाला आहे. प्रल्हाद माणिकराव चव्हाण (वय ५५ वर्ष) आणि हनुमान वैराळ (दोघे रा. वसूर ता. मानवत) हे पाथरीकडे येत होते त्याचवेळी इनोव्हा कार (क्र. एम एच. १४ जी. डि. ७७०४) या गाडीने विरुद्ध दिशेने येत मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. ही इनोव्हा गाडी मुंबईच्या एका उपजिल्हाधिकाऱ्याची असल्याचं सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा - Nandurbar Accident : 'तो' फोटो ठरला अखेरचा, 7 जिवलग मित्रांचा एकाच वेळी जागीच मृत्यू
उपजिल्हाधिकारी यांची ही गाडी नांदेडकडे जात होती. उपजिल्हाधिकारी या मूळ नांदेडच्या निवासी असून मुंबई येथे कार्यरत आहेत. पोहेटाकळी शिवारात या गाडीने दुचाकीला उडवल्यानंतर दुचाकीस्वार प्रल्हाद चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर हनुमान वैराळ गंभीर जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत तत्काळ जखमींना पाथरीच्या सामान्य रुग्णालयात दाखल केलं. परंतु गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी जखमीला खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले होते. इनोव्हा गाडीत असलेल्या व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेत अद्यापही कोणावर गुन्हा दाखल झाला नाही. परंतु दिवाळीत चव्हाण परिवारावर दुःखाचं आभाळ कोसळलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world