महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकापूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आजपासून झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. 83 वर्षाचे पवार यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या 55 सशस्त्र जवानांची तुकडी तैनात असेल. झेड प्लस ही सर्वोच्च सुरक्षा श्रेणी आहे. शरद पवारांच्या घरी अनेक बैठका आणि गाठीभेटी होत असतात. रोज अनेक नागरिक किंवा कामकाजासाठी नेते मंडळी येत असतात. पण सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.
सद्यपरिस्थितीत शरद पवारांना राज्य सरकारकडून झेड प्लसची सुरक्षा देण्यात आली आहे. परंतू आता केंद्राकडून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या काही अधिकाऱ्यांनी एनसीपी शरद पवार पक्षाच्या कार्यालयात यासंबंधित चर्चा केली होती. यावेळी सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पवारांच्या सुरक्षेची चाचपणी केली. यानंतर पवारांसोबत चर्चा झाल्यानंतर राज्यातील घटनाक्रम पाहता शरद पवारांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मनोज जरांगेंचं आंदोलन...
काही दिवसांपूर्वी शरद पवार हे मराठा आरक्षणाचे नेते मनोज पाटील यांच्या उपोषणाच्या स्थळी गेले होते. यावेळी काही आंदोलकांनी त्यांना काळे झेंडेही दाखवले होते. भविष्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती चिघळू शकते. काही वर्षांपूर्वी शरद पवारांवर दिल्लीत एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची अधिक काळजी घेतली जात आहे.
नक्की वाचा - 'लाडक्या बहिणी'नंतर राज्य सरकार आता 'लाडका शेतकरी' योजना राबवणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
आगामी विधानसभेसाठी शरद पवारांनी काम सुरू केलं आहे. ते राज्यभरात दौरा करीत आहेत. ते प्रत्येक विधानसभेत जाऊन समीक्षा करीत आहेत. सोबतच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत.
झेड प्लस सुरक्षा कशी असते?
झेड प्लस भारतातील सर्वोच्च सुरक्षा कॅटेगरी आहे. या सुरक्षा कव्हरमध्ये सीआरपीएफचे दहा जवान, एनएसजी कमांडो आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. यात एकूण 55 सुरक्षा कर्मचारी असतात. या कव्हरमध्ये सामील कमांडोंनी मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलेलं असतं. झेड प्लस सिक्युरिटी कव्हरमध्ये तैनात जवानांकडे आधुनिक हत्यारं असतात. पंतप्रदान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह VVIP व्यक्तींनी ही सुरक्षा दिली जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world