
राहुल कांबळे, नवी मुंबई
नवीन पनवेलमधील 62 वर्षीय निवृत्त व्यक्तीची तब्बल 73.72 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख करून दिल्यानंतर, सोन्याच्या ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते मे 2024 दरम्यान 'बंबल' (Bumble) या डेटिंग अॅपवरून पीडिताची झिया नावाच्या महिलेच्या संपर्कात ओळख झाली. दोघांमध्ये ओळख वाढल्यावर व्हॉट्सअॅपवर नियमित संवाद सुरू झाला. या कालावधीत आरोपीने सोन्याच्या ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळेल, असे सांगत पीडिताला गुंतवणुकीस प्रवृत्त केले.
(नक्की वाचा- Shirdi Crime News: 'ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट' घोटाळ्याची व्याप्ती वाढली, नागरिकांची कोट्यवधींचा फसवणूक)
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, झियाने पीडिताला एका खास ट्रेडिंग अॅपवर गुंतवणूक करण्यास सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून पीडिताने हळूहळू एकूण ₹73,72,000 या रकमांची गुंतवणूक केली. मात्र, काही आठवडे उलटूनही नफा किंवा परतावा न मिळाल्यामुळे पीडिताला संशय आला. पीडिताने पैसे व परताव्याबाबत विचारणा केली असता आरोपीने प्रतिसाद देणे थांबवले व नंतर पूर्णपणे संपर्क तोडला. अखेर फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर पीडिताने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तक्रारीनंतर खांदेश्वर पोलिसांनी 4 जुलै 2025 रोजी प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवला आहे. संबंधित गुन्हा कलम 420 (फसवणूक), 34 (सामूहिक उद्देश) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांअंतर्गत नोंदवण्यात आला आहे. सध्या आरोपी पसार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. डिजिटल व्यवहारांचे विश्लेषण करून आरोपीचे लोकेशन व आर्थिक पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असेही खांदेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
(नक्की वाचा- Beed Crime : 'मी आत्महत्या करेन, तुझ्या आई-वडिलांनाही मारेन' म्हणत पाठलाग; बीडमध्ये शाळकरी मुलीसोबत घडला संतापजनक प्रकार )
हाच प्रकार सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या ट्रेंडचा भाग आहे. विशेषतः सोशल मीडिया, डेटिंग अॅप्स आणि खोट्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून वरिष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढत आहेत. नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. कुणाही अपरिचित व्यक्तीवर विश्वास ठेवून मोठी आर्थिक गुंतवणूक करू नये, तसेच अनोळखी लिंक किंवा अॅप डाऊनलोड करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world