
सुरज कसबे, पुणे
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानमंडळात ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हा राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमुळे केवळ मंत्र्यांच्या वर्तनावरच नव्हे, तर ऑनलाइन रमीच्या वाढत्या व्यसनाधीनतेवर आणि त्यातून असंख्य तरुणाईचे उद्ध्वस्त होत असलेल्या आयुष्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला आहे. अनेक तरुण या गेमच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ऑनलाइन रमीच्या व्यसनात अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या गेमच्या नादात कित्येकांनी आपली शेतजमीन गहाण ठेवल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. हे व्यसन किती खोलवर रुजले आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते.
(नक्की वाचा: 'सर्व हिंदूंचा हिशेब केला जाईल', योगी सरकार गेल्यावर.... सक्तीनं धर्मांतर करणाऱ्या छांगूरच्या गुंडांची धमकी )
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील जय जाधव या तरुणाचे आयुष्य याच ऑनलाइन रमीच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झाले आहे. अवघ्या २६ व्या वर्षीच त्याच्या डोक्यावर तब्बल ८४ लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. जयने रिअल इस्टेटच्या व्यवसायातून पिंपरी-चिंचवडमध्ये उभे केलेले २३ लाख रुपये या गेममध्ये गमावले. एवढेच नव्हे, तर त्याने मित्रमंडळीकडून २० लाख रुपयांचे कर्ज घेतले. याशिवाय, करमाळा येथील त्याची वडिलोपार्जित दीड एकर शेती आणि स्वतःची स्कॉर्पिओ (Scorpio) गाडी गहाण ठेवून त्याने आणखी २० लाख रुपयांचे कर्ज उचलले. या सर्व व्यवहारांतून जयच्या डोक्यावर जवळपास ८४ लाख रुपयांचे प्रचंड कर्ज झाले आहे, ज्यामुळे त्याचे भविष्य अंधकारमय झाले आहे.
( नक्की वाचा : धर्मांतरानंतर आरक्षण घेणाऱ्यांची खैर नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा )
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानमंडळात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ पाहून जयने खंत व्यक्त केली. त्याने म्हटले की, "मंत्र्याचा व्हिडिओ पाहून कोणीही चुकीची प्रेरणा घेऊ नका. झालं तेवढं नुकसान पुरे. आता आहे तिथं थांबा." हे त्याचे आवाहन अशा सर्व तरुणांसाठी आहे, जे या व्यसनात अडकले आहेत. या व्यसनामुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर कुटुंब आणि सामाजिक जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world