- सागर कुलकर्णी, प्रतिनिधी
Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा वारसा जतन करण्यासाठी त्यांचे एक भव्य स्मारक आणि संग्रहालय उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण हे संग्रहालय नेमके कुठे असावे, यावरून अजित पवार यांचे दोन्ही पुत्र जय पवार (Jay Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यात मतमतांतरे समोर येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
जय पवारांचं मत काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जय पवार यांनी मंगळवारी (10 फेब्रुवारी) मंत्रालयातील सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या दालनात पक्षाच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अजित पवार यांचे संग्रहालय पुणे शहरात करण्याची इच्छा व्यक्त केली. अजित पवार यांचे पुणे जिल्हा आणि शहरावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे स्मारक आणि संग्रहालय पुण्यात असावं, अशी भूमिका जय पवार यांनी मांडलीय. पुण्याच्या विकास आराखड्यात आणि शहराचा कायापालट करण्यामध्ये अजित पवार यांचे योगदान मोठे आहे.
(नक्की वाचा: Sharad Pawar Health News: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन; पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडतंय?)
पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम
दुसरीकडे पार्थ पवार यांनी याउलट भूमिका घेतल्याचे समजते. पार्थ पवार यांच्या मते, अजित पवार यांचे स्मारक आणि संग्रहालय हे त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामतीत असायला हवे. बारामती ही पवारांची ओळख आहे त्यामुळे त्यांचे स्मारक बारामतीतच व्हावे, असा पार्थ यांचा आग्रह असल्याची माहिती समोर आलीय.
अंतिम निर्णय काय होणार?दोन भावांनी दोन वेगवेगळ्या शहरांचे नाव सुचवल्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आता नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे हे राज्याचे सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर आहे, तर बारामती हे विकासाचे मॉडेल मानले जाते. या दोन्ही शहरांशी अजित पवारांचे अतूट आणि खास नाते आहे. त्यामुळे हा पेच कसा सुटतो आणि अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world