जाहिरात

Raj Thackeray: राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला थेट सल्ला; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतरची प्रतिक्रिया Viral

Raj Thackeray: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

Raj Thackeray: राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला थेट सल्ला; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतरची प्रतिक्रिया Viral
Raj Thackeray: सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर काही मिनिटांतच राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई:

Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर अखेर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आता नवा पेच निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

राष्ट्रवादीचा अध्यक्ष मराठीच असावा

सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर काही मिनिटांतच राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात जो विचका झाला आहे, त्यावर भाष्य करण्याची इच्छा नसली तरी सध्याच्या घडामोडींवर बोलणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्राच्या मातीतील आणि रांगडा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीतरी मराठीच असायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, अध्यक्षपदी पाटील चालतील पण पटेल नकोत, अशा शब्दांत त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर निशाणा साधला आहे.

अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचे नाव चर्चेत

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत पक्षात दोन गट पडल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे आता उपमुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी आल्याने त्या पक्षसंघटनेसाठी किती वेळ देऊ शकतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, प्रफुल्ल पटेल हे सध्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अध्यक्षपदासाठी दावा केला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पटेल यांच्या नावाला विरोध दर्शवत मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.


( नक्की वाचा : Sunetra Pawar : अजित पवारांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार गहिवरल्या, उपमुख्यमंत्री झाल्यावर दिली भावुक प्रतिक्रिया )
 

अजित पवारांच्या आठवणींना राज ठाकरेंनी दिला उजाळा

राज ठाकरे यांनी केवळ राजकीय भूमिकाच मांडली नाही, तर अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना अत्यंत भावूक शब्दांत श्रद्धांजली देखील वाहिली होती. प्रशासनावर अचूक पकड असलेला आणि फाईलींचा गुंता सोडवण्याचे कसब असलेला नेता महाराष्ट्राने गमावला आहे, असे त्यांनी म्हटले होते. अजित पवार हे स्पष्टवक्ते होते आणि आश्वासन देऊन लोकांचा पिंगा घालणे त्यांच्या स्वभावात नव्हते. काम होणार असेल तर ते ताकदीने पूर्ण करायचे आणि नसेल तर तोंडावर सांगायचे, ही त्यांची पद्धत प्रशासनासाठी महत्त्वाची होती, अशा आठवणी राज यांनी सांगितल्या.

जातीयवादापासून दूर राहिलेला नेता

अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले की, त्यांच्या राजकारणात जातीपातीला कधीही स्थान नव्हते. सध्याच्या काळात जात न मानता राजकारण करणारे नेते दुर्मिळ होत चालले आहेत, त्यात अजित पवार हे आघाडीवर होते. राजकारणातील विरोध हा केवळ राजकीय असावा, तो वैयक्तिक नसावा याचे भान असलेल्या नेत्यांपैकी ते एक होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. आता सुनेत्रा पवार यांच्या नव्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com