अविनाश पवार, पुणे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्र. 17 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले स्थानिक नेते माधव पाटील यांनी थेट जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा त्यांना पत्र लिहून महिलांच्या उत्थानासाठी 30 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे.
जागतिक बँकेचे 14 वे अध्यक्ष अजय बंगा यांना पाठवलेल्या या पत्रात, माधव पाटील यांनी अत्यंत गरिबी संपवण्याचे आणि समाजाचा सामायिक विकास करण्याचे अजय बंगा यांचे जे व्हिजन आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. पाटील यांनी पत्रात भारतातील अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये थेट आर्थिक मदतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
बिहार आणि मध्य प्रदेशचा उल्लेख
बिहार निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाने महिलांच्या बँक खात्यात 10,000 जमा केल्याचा, तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील निवडणुकीपूर्वी 'लाडली बहीण/लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये हस्तांतरित केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. थेट आर्थिक लाभांमुळे निवडणुकांच्या निकालांवर लक्षणीय परिणाम होतो, असे विविध तज्ञांचे विश्लेषण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
30 कोटींची मागणी आणि वचन
मात्र, या आर्थिक हस्तांतरणांनंतरही महिला, शेतकरी आणि कामगार कुटुंबातील महिलांच्या दीर्घकालीन जीवनात कोणतीही लक्षणीय सुधारणा) झालेली नाही, याकडे माधव पाटील यांनी लक्ष वेधले आहे. माधव पाटील हे PCMC प्रभाग क्रमांक 17 मधून आगामी निवडणूक लढवणार असून, त्यांच्या प्रभागात सुमारे 30,000 महिला मतदार आहेत.
माधव पाटील यांनी आपल्या प्रभाग 17 मधील प्रत्येक महिला मतदाराला 10,001 देण्याचा संकल्प केला आहे. हा केवळ निवडणूक लाभ नसून महिलांच्या आर्थिक प्रगतीची आणि सक्षमीकरणाची दीर्घकालीन बांधिलकी आहे, असे ते म्हणतात. या योजनेसाठी त्यांनी जागतिक बँकेकडे 30 कोटी रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे.
भ्रष्टाचार न करण्याचे आश्वासन
पाटील यांनी या कर्जाची रक्कम लागू व्याजासह परत करण्याची तयारी दर्शविली आहे आणि भ्रष्टाचार न करण्याचे आश्वासन दिले आहे. जागतिक बँकेने हे कर्ज दिल्यास, महिलांच्या कौशल्य विकास आणि स्वयंपूर्णतायासाठी अथक प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world