"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत भारताने केवळ विकास केला नाही, तर जगासमोर एका नव्या राष्ट्रशक्तीचा आदर्श उभा केला आहे. आजचा भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारा, डिजिटल तंत्रज्ञानाने सक्षम झालेला, उद्योगशील आणि नारीशक्तीला केंद्रस्थानी ठेवणारा समर्थ राष्ट्र म्हणून जगभरात ओळखला जात आहे," असे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मे 2026 रोजी आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची 12 वर्षे पूर्ण करत आहेत. या ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेच्या एक तपपूर्तीनिमित्त 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे करण्यात आले. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्याच शुभहस्ते या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.
'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' हा परिवर्तनाचा इतिहास: रवींद्र चव्हाण
कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, हा विशेष अंक म्हणजे खरंतर देशाच्या जनतेने स्वतः अनुभवलेला परिवर्तनाचा इतिहास आहे. गेल्या एका तपामध्ये सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेला बदल प्रत्येक भारतीयाने पाहिला आहे. शेतकरी, कामगार, गरीब, वंचित आणि उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी व्यवस्था मोदी सरकारने निर्माण केली. पारदर्शक शासनपद्धतीमुळे सरकारी योजनांचा लाभ थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला आहे. देशातील गरीबांच्या घरात उजेड, महिलांच्या आयुष्यात सन्मान, युवकांच्या हातात संधी आणि सामान्य नागरिकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असं देखील रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.
“एक भारत, अखंड भारत” ते “विकसित भारत” या प्रवासातील परिवर्तनाची 12 विषयांवरील तथ्यपूर्ण मांडणी या विशेष अंकातून करण्यात आली आहे. यामध्ये अखंड भारत, अंत्योदय, सुरक्षित भारत, युवा भारत, मातृप्रधान भारत अशा विषयांसह विज्ञान, उद्योग आणि विकसित भारत 2047 यावर विशेष प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. "काही व्यक्ती अध्यात्मातून तपस्या करतात, काही कला आणि साहित्याच्या माध्यमातून समाजासाठी जगतात; पण मोदीजींनी स्वतःला राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले आहे. म्हणूनच ते राष्ट्र तपस्वी आहेत," असे चव्हाण यांनी नमूद केले.
याचक राष्ट्राला जागतिक महाशक्ती बनवले: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातील ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेतला. "देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवलं जाऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. फक्त अनुदान घेणे ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभा असलेला भारत देश बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ज्या भारताकडे पूर्वी एक याचक राष्ट्र म्हणून पाहिले जायचे, त्याला जागतिक महाशक्ती बनविण्याचे काम त्यांनी केले," असे मुख्यमंत्री म्हणाले.
देशाचा आणि राज्याचा GDP तिप्पट ते चौपट वाढला
विकासाची आकडेवारी मांडताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या विकासाभिमुख नियोजनबद्ध रणनीतीमुळेच देशाचा मोठा आर्थिक विकास झाला आहे. भारताचा GDP 2013-14 मध्ये 103 लाख कोटी होता, तो 2025-26 मध्ये 357 लाख कोटींपर्यंत म्हणजेच थेट तिप्पट वाढला आहे. महाराष्ट्राचा GDP 2013-14 मध्ये 13 लाख कोटी इतका होता, तो 2025-26 पर्यंत 54 लाख कोटी इतका वाढला आहे. हर घर शौचालय, उज्ज्वला गॅस योजना यांसारख्या गरीब केंद्रित अजेंड्यामुळे मागील 10 वर्षांत 25 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world