Mumbai News: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि अधिवेशनातील ऑनलाईन रमी खेळण्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळत आहे. कोकाटे यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता पुढील आठवड्यापर्यंत वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांच्या वारंवारच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कृतींमुळे नाराज आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी कोकाटे यांना यापूर्वी किमान तीन वेळा तोंडी समज दिली होती आणि त्यांना वादग्रस्त विधाने टाळण्यास सांगितले होते. मात्र, या सूचनांनंतरही त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. ज्यामुळे अजित पवार वैतागले असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने कोकाटे यांच्यावरील कारवाई अटळ मानली जात आहे.
(नक्की वाचा - Kalyan News: वाह रे अधिकारी! एकाच दिवशी KDMCचे 3 अधिकारी ACBच्या जाळ्यात)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अन्य प्रमुख नेते सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांनीही पक्षांतर्गत बैठकांमध्ये या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. कोकाटे यांना वारंवार सांगूनही त्यांनी वादग्रस्त विधाने आणि कृती सुरूच ठेवल्याने, आता त्यांच्यावर कारवाई करायची की नाही, हे अजित पवार यांनीच ठरवावे, असे मत या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे पक्षांतर्गत कोकाटेंविरोधात एक मजबूत भूमिका तयार झाली आहे.
या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेतल्याचे समजते. कोकाटे जर दोषी असतील आणि त्यांचे वर्तन लोकप्रतिनिधीला अशोभनीय असेल, तर यातून एक कडक संदेश देण्याच्या मानसिकतेवर मुख्यमंत्री आहेत. लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे आणि जबाबदारीने वागले पाहिजे, असा स्पष्ट संदेश देण्याची त्यांची इच्छा आहे. यामुळे कोकाटेवरील कारवाईची शक्यता अधिकच वाढली आहे.