Political News : महायुती सरकारमध्ये सगळं आलबेल आहे, असं म्हणता येणार नाही. शिवसेना आणि भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली आहे की, अजित पवार विकासकामांचे निधी थांबवतात. एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांशी याबाबत चर्चा देखील केल्याची माहिती समोर येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवारांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. निधी वाटप फाईल यावर मी एकटा कुठे सही करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील देखील सही करतात, असं अजित पवारांनी म्हणत शिवसेनेच्या आमदारांची कोंडी केली आहे. अजित पवारांनी निधी वाटप यावरून होत असलेल्या टीकेवर कालच्या आमदार बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले.
अजित पवार निधी देत नाही अशी नाराजी शिवसेना आमदार यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखविली होती. तसेच काही दिवसांपूर्वी भाजप आमदारांनी अजित पवार यांची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती.
याचा संदर्भ देत अजित पवार यांनी निधी वाटप अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतात. आगामी काळात पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मान्यतेने निधी वाटप होणार असल्याचे सांगितलं. मात्र अजित पवार यांना महायुतीत मित्र पक्ष व्हिलन करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्याकडे बोट दाखवत सर्वांचीच कोंडी केली आहे.