सूरज कसबे, आळंदी, पुणे
कैवल चक्रवर्ती साम्राज्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा 193 वा पालखी प्रस्थान सोहळा, अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. तर दुसरीकडे लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. पुन्हा इंद्रायणी नदीमध्ये बर्फासारखं फेसाळलेलं पाणी आढळून आलं आहे. गेल्या दहा वर्षांपासून या इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न प्रलंबित असून सुटायचं नाव घेत नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वारकरी बांधवांनी वारंवार या नदी प्रदूषणात संदर्भात आवाज उठवला आहे. संसदेच्या अधिवेशनामध्येही इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. राज्याच्या विधिमंडळामध्ये सुद्धा या इंद्राणीच्या नदी प्रदूषणाबाबत चर्चा झाली. मात्र परिस्थिती अद्यापही जैसे थेच आहे.
(नक्की वाचा- आषाढी वारीत सहभागी दिंड्याना 20 हजार रुपयांचे अनुदान, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली. नदीच्या पाण्याचे नमुने देखील तपासणे आणि नदीतील पाणी हे प्रदूषित असल्याचे त्यांनी जाहीर देखील केले. मात्र याबाबत काही ठोस पाऊले उचलली जात नाहीत. या इंद्रायणी नदी काठी असलेल्या औद्योगिक कारखान्यांमध्ये रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जाते. त्या रसायनामुळेच या नदीपात्रामध्ये फेस निर्माण होतो. नदीतील बायोकेमिकल ऑक्सिजनची ( BOD) मात्रा ही 30 पेक्षा अधिक असल्याचं निदर्शनात आले आहे.
वारकरी बांधव आणि इंद्रायणी नदीचं नातं?
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर असलेल्या नागफणी कटाड्याजवळ या इंद्रायणी नदीचा उगम होतो. पुढे टाटा धरणामुळे ही इंद्रायणी नदी लुप्त होते. या नदीचा प्रवाह लोणावळा, कामशेत, कान्हे फाटा, वडगाव मावळ, तळेगाव आणि पुढे तीर्थक्षेत्र देहू, निघोजे, तळवडे, टाळगाव चिखली, मोई, मोशी, चिंबळी, श्री क्षेत्र आळंदी असा वाहतो आणि पुढे भीमा नदीला जाऊन मिळतो.
(नक्की वाचा- 'आता पाहीन पांडुरंगाला'; 339 व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक!)
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी बांधव देहू आणि आळंदीमध्ये दाखल होत असतात याच इंद्रायणी नदीमध्ये ते स्नान करतात. याच नदीचे पाणी तीर्थ म्हणून पितात. जशी चंद्रभागा तशीच इंद्रायणी अशी त्यांची आस्था असते. अवघ्या काही दिवसांवरती पालखी सोहळा येऊन ठेपलाय आणि त्याच्या आधीच या इंद्रायणी नदीची अशी अवस्था झालीय. त्यामुळे वारकरी बांधवांनी तीव्र नाराज व्यक्त केलीय. जर पालखी सोहळ्याच्या आधीच या प्रदूषित नदीची स्थिती सुधारले नाही तर वारकऱ्यांच्या आरोग्य प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कारणीभूत असलेल्या कारखान्यांवरती सरकार काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचा असणार आहे.