जाहिरात

VIDEO: "कदाचित हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल, माझं बरं वाईट झालं तर...", प्रसाद वेदपाठकची मदतीसाठी हाक

घाटकोपर येथील गृहनिर्माण सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता कमालीचा चिघळला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने एक भावुक व्हिडिओ शेअर करत, आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असून कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

VIDEO: "कदाचित हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल, माझं बरं वाईट झालं तर...", प्रसाद वेदपाठकची मदतीसाठी हाक

Viral VIDEO: मुंबईतील घाटकोपर येथील एका सोसायटीच्या आवारात जैन साधू-साध्वींसाठी विनापरवानगी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. या विरोधात सर्वप्रथम आवाज उठवणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्युबर प्रसाद वेदपाठक याने सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. "माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असून, माझ्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे," असा खळबळजनक आरोप प्रसादने केला आहे.

कसा चिघळत गेला वाद?

प्रसाद वेदपाठक याने व्हिडिओमध्ये 4 जूनपासून घडलेल्या सर्व घडामोडींचा पाढाच वाचला आहे. 4 जून रोजी  सोसायटीमध्ये अंतर्गत परवानगी न घेता पांढरी पट्टी मारण्यात आल्याने पहिला वाद झाला. 8 व 9 जून रोजी वेदपाठक कुटुंबीयांनी संबंधित सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर ज्यांनी पट्टी मारली होती, त्यांनी ती स्वतःहून काढून घेतली. 11 जून रोजी वाद मिटला असे वाटत असतानाच नगरसेवक प्रवीण छेडा यांनी पोलिसांना पत्र लिहून प्रसाद वेदपाठक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि आंदोलन छेडले.

(नक्की वाचा-  School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?)

खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट

व्हिडिओमध्ये अत्यंत अस्वस्थ दिसणाऱ्या प्रसादने सांगितले की, "वाद पट्टीपुरता मर्यादित होता, पण आता त्याला भलतीच राजकीय आणि धार्मिक दिशा दिली जात आहे. माझ्याबद्दल समाजात खोटे गैरसमज पसरवले गेले आहेत. काही लोक आमचा पाठलाग करत आहेत, घरात माणसे पाठवून धमकावले जात आहे. माझ्या कुटुंबाची मला प्रचंड चिंता सतावत आहे, मी घरातील कर्ता पुरुष आहे."

तो पुढे म्हणाला, "मी जे बोललोच नाही, त्यावरून भलत्याच मुद्द्यांवर माझ्यावर आधीच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मला समजते आहे. आमच्याच जमिनीवर आम्हाला दाबण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. जर माझ्या जीवाचे बरे-वाईट झाले, तर मी मुख्यमंत्र्यांना आणि न्यायव्यवस्थेला विनंती करतो की यात लक्ष घालावे."

(नक्की वाचा-  Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)

मनसेचा पाठिंबा

या संपूर्ण कठीण प्रसंगात केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्याला पाठिंबा दिल्याचा उल्लेख प्रसादने केला. नुकतीच त्याने मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. मनसेने या प्रकरणी प्रसादच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली होती. प्रसादने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "माझ्या जीवाला धोका असून काही विपरीत घडल्यास राज साहेब, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांना या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती माहिती आहे."

शेवटी अत्यंत हताशपणे जैन समाजालाही आवाहन करताना तो म्हणाला, "हा वाद वैयक्तिक किंवा धार्मिक नव्हता. सध्याच्या घडीला मला फक्त आणि फक्त मदतीची गरज आहे." 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com