पुणे जिल्ह्यातील (Pune Picnic Spots) मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्हा या आठ तालुक्यांतील गड-किल्ले, पर्यटनस्थळे, धरणे, धबधबे अशा पर्यटनस्थळी आता जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या तालुक्यातील पर्यटनाच्या ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. धोकादायक पर्यटनामुळे अपघात होण्याच्या प्रकारांत वाढ होऊन त्यात काहींना जीव गमवावा लागण्याच्या घटना दरवर्षी घडतात. यंदाही पाऊस सुरू होताच दोन दिवसांत दोन दुर्दैवी घटना घडल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मंगळवारी जमावबंदीचे आदेश जारी केले.
नेमका आदेश काय?
वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे, खोल पाण्यात पोहणे यांवर बंदी. धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि नैसर्गिक धबधब्यांच्या ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 31 जुलैपर्यंत लागू असतील.
कोणत्या ठिकाणी आदेश लागू?
मावळ : भुशी धरण आणि गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे, लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील धरणे, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, राजमाची पॉइंट, सहारा पूल, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर.
लोणावळा : वन क्षेत्रातील पर्यटनस्थळांवर सायंकाळी सहानंतर बंदी.
मुळशी : मुळशी धरण, ताम्हिणी घाट जंगल परिसर, मिल्कीबार धबधबा.
हवेली : खडकवासला धरण, वरसगाव धरण, सिंहगड.
आंबेगाव : भीमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंढवळ धबधबा.
जुन्नर : माळशेज घाट, धरणे, गडकिल्ले परिसर, शिवनेरी, माणिकडोह.
भोर : भाटघर धरण, गडकिल्ले परिसर, धबधबे.
भोर : भाटघर धरण, गडकिल्ले परिसर, धबधबे.
वेल्हा : धरण, गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा.
खेड : चासकमान धरण, भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे, जंगल परिसर.
इंदापूर : कुंभारगाव बोटिंग क्षेत्र.
नक्की वाचा - नागरिकांनीही प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ; भुशी डॅमसारखी परिस्थिती उद्भवली तर कसा कराल बचाव?
बंदी आदेश नेमका काय आहे ?
मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी धबधबे वाहू लागले आहेत. या तालुक्यांतील भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात पुण्यासह राज्याच्या विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात पर्यटक वर्षाविहारासाठी येतात. शनिवार, रविवार आणि सुट्यांच्या दिवशी तर पर्यटकांची खूप गर्दी होते. त्यामुळे, वाहतूक कोंडी होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world