यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News: पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या आवारात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे, ज्याने संपूर्ण शिक्षण विश्व हादरले आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर केवळ पाणी पिण्यासाठी गेलेला एक तरुण विद्यार्थी थेट मृत्यूच्या पाशात ओढला गेला. वॉटर कुलरचा नळ धरताच लागलेल्या भीषण इलेक्ट्रिक शॉकमुळे या 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या या विद्यार्थ्याने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला आणि एका कष्टाळू शेतकरी कुटुंबाचा आधार कायमचा निखळला.
चैतन्य पुंडलिक चव्हाण असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी होता. पुण्यातील कृषी महाविद्यालयात तो 'एग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट' (MBA) च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून मोठ्या आशेने त्यांनी आपल्या मुलाला पुण्याला शिकायला पाठवले होते. मात्र, एका रात्रीच्या दुर्दैवी घटनेने सर्व स्वप्ने धुळीला मिळवली आहेत.
त्या रात्री नेमकं काय घडलं?
ही घटना 14 मार्च रोजी रात्री घडली. मेसमध्ये जेवण उरकल्यानंतर चैतन्य पाणी पिण्यासाठी तिथल्या वॉटर कुलरजवळ गेला. प्रत्यक्षदर्शी मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी पुरेसे थंड येत नसल्याने चैतन्यने कुलरची पिन पुन्हा सॉकेटमध्ये व्यवस्थित लावली. मात्र, जसा त्याने पाण्याच्या नळाला स्पर्श केला, तसा त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.

हा शॉक इतका भीषण होता की चैतन्य तिथेच नळाला चिकटून राहिला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या मित्रांनाही काही सुचेनासे झाले. अखेर वीजपुरवठा खंडित केल्यानंतर चैतन्य जमिनीवर कोसळला आणि शुद्ध हरपली.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या हाय प्रोफाईल सोसायटीतील भयंकर भांडण, शेजारच्या अंगावर सोडला कुत्रा, 3 दिवस... )
अनवाणी पाय ठरले जीवघेणे?
या घटनेमागे मेसचा एक नियमही कारणीभूत असल्याची चर्चा सध्या महाविद्यालय परिसरात आहे. मेसमध्ये चपला घालून जाण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे चैतन्य अनवाणी पायानेच पाणी पिण्यासाठी गेला होता. जमिनीशी थेट संपर्क आल्यामुळे विजेच्या धक्क्याची तीव्रता प्रचंड वाढली आणि त्याचा थेट परिणाम चैतन्यच्या मेंदूवर झाला. त्याला तातडीने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर आता कुठे प्रशासनाला जाग आली असून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (राहुरी) सर्व कृषी महाविद्यालयांचे 'सेफ्टी ऑडिट' करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये विद्युत, अग्नी आणि स्ट्रक्चरल ऑडिटचा समावेश असेल. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी 'अकस्मात मृत्यू'ची नोंद केली असून या निष्काळजीपणाला नेमके जबाबदार कोण, याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करत आहेत.
( नक्की वाचा : Pune News: बाबो! 47 लाखांच्या नोकरीवर मारली लाथ; पुण्याच्या या तरुणाने असं का केलं? सोशल मीडियावर चर्चाच चर्चा )
घटनेबाबत बोलताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास खर्चे यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. चैतन्यच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेला जवळपास 9 लाख रुपयांचा खर्च महाविद्यालयाने उचलला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही मदतीचे आश्वासन मिळाले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world