पुण्यातील खेड तालुक्यातून बालविवाहाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने वेळेवर चाईल्ड हेल्पलाईनवर संपर्क साधून स्वतःचे लग्न रोखले आहे. इतकेच नव्हे तर, मुलीला सज्ञान दाखवून तिचा विवाह लावून देण्यासाठी तिच्या स्वतःच्या वडिलांनीच तिच्या आधार कार्डवर खाडाखोड करून वय वाढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मुलीच्या कामगार कंत्राटदार असलेल्या वडिलांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
चाईल्ड हेल्पलाईनवर फोन आणि पोलिसांची कारवाई
उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने गेल्या आठवड्यात चाईल्ड हेल्पलाईनवर फोन करून तिचे वडील तिचे अल्पवयीन असतानाही जबरदस्तीने लग्न लावून देत असल्याची तक्रार केली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून खेड तालुक्यातील घटनास्थळी धाव घेतली. जेव्हा पोलिसांनी वडिलांकडे चौकशी केली, तेव्हा त्याने आपली मुलगी वयात आल्याचा दावा केला आणि पुरावा म्हणून तिचे आधार कार्ड पोलिसांना दाखवले.
वडिलांनी मान्य केली आधार कार्डवरील खाडाखोड
मात्र, पोलिसांसमोर मुलीने तिच्या वडिलांचा पोलखोल केला. वडिलांनीच आपल्या आधार कार्डवरील जन्मवर्षात फेरफार करून वय लपवल्याचे तिने पोलिसांना सांगितले. कडक चौकशीदरम्यान वडिलांनी आपला गुन्हा मान्य केला. खेड तालुक्यातील एका गावातून त्यांनी हे बनावट आधार कार्ड तयार करून घेतले असल्याचे पोलिसांना सांगितले.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिच्या वडिलांवर भारतीय न्याय संहिता कलम 336, कलम 337 आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना नोटीस बजावली असून, हे बनावट आधार कार्ड तयार करून देणाऱ्या केंद्राचा आणि व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world