अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune Husband Wife Divorce Viral News : लग्नाचं नातं हे सात जन्मांचं असतं असं म्हणतात. कोणी प्रेमविवाह करतो, तर कोणी अरेंज मॅरेजच्या बंधनात अकडतो. लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज पती-पत्नीचं नातं आयु्ष्यभर घट्ट असणंच महत्त्वाचं असतं. नांदा सौख्य भरे असं अनेक जण लग्नसमारंभ पार पडल्यानंतर म्हणतात. पण कधी कधी या नात्यात दुरावाही निर्माण होतो. म्हणजेच पत्नी-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद असतील, तर ही लग्नाची नाळ तुटायला वेळ लागत नाही. असंच एक धक्कादायक प्रकरण पुण्यात घडलं आहे.
येथील एका नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याने लग्नानंतर एका दिवसातच म्हणजे फक्त 24 तासांमध्येच परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी कोर्टात जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ऐकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पती-पत्नीच्या या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगली आहे.
नक्की वाचा >> "मॅडम मर्डर झालाय...",पॉडकास्ट सुरु असतानाच धक्कादायक कॉल, ती महिला पोलीस अधिकारी कोण? Video व्हायरल
एका मुद्द्यावरून पती-पत्नीत झाले वैचारिक मतभेद
मिळालेल्या माहितीनुसार,पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून त्यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते.या प्रेमसंबंधातूनच विवाह झाला होता.पण लग्नानंतर पतीने आपण मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असून कामानिमित्त वर्षभर बाहेर राहावे लागते,असं पत्नीला सांगितलं.त्यानंतर पत्नीला धक्का बसला. या मुद्द्यावरून दोघांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. विशेष म्हणजे, याप्रकरणी कोणतीही हिंसक घटना,फौजदारी गुन्हा किंवा तक्रार दाखल झालेली नाही.दोघांनीही शांततेत आणि परस्पर संमतीने कायदेशीर मार्गाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
नक्की वाचा >> Raigad News: खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात NCP जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंचं नाव, कोणी रचला कट?
या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पाहणाऱ्या अॅड. राणी कांबळे-सोनवणे यांनी म्हटलंय की, दोन्ही बाजूंनी योग्य समजूत काढत कायद्याच्या चौकटीत विवाह विच्छेद करण्यात आला. ही घटना आधुनिक काळातील विवाहसंस्था,सुसंगतता,अपेक्षा आणि संवाद यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरत आहे.लग्नापूर्वी परस्पर आयुष्याशी संबंधित मूलभूत बाबींवर स्पष्ट संवाद असणे किती महत्त्वाचे आहे,याची जाणीव या घटनेतून होत असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त केले जात आहे.