Pune News: पुणे शहरासह संपूर्ण पुणे विभागात अस्वच्छता, अन्नातील भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. एफडीएने राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान 21 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
ही कारवाई 23 ते 28 जुलैदरम्यान ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र' या मोहिमेअंतर्गत करण्यात आली आहे. परवाने निलंबित करण्यात आलेल्या 21 आस्थापनांमध्ये पुण्यातील नामांकित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आणि बेकऱ्यांचा समावेश आहे. पुणे, लोणावळा आणि जुन्नर परिसरातील अनेक नामांकित आस्थापनांचा समावेश आहे.
(नक्की वाचा- लोक हसले, पण गडी खचला नाही; 4 आंबे साडेतीन लाखांना विकून दाखवले, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा)
कारवाई झालेली प्रमुख हॉटेल्स आणि आउटलेट्स
- ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड (विमान नगर)
- हॉटेल लक्ष्मण (प्रभात रोड)
- पंजाबी शेफ (मुंढवा)
- माधव बिर्याणी (मुंढवा)
- मदिना फॅमिली रेस्टॉरंट (भवानी पेठ)
- हिना बेकरी (सिंहगड रोड)
- इंडियन बेकरी (नऱ्हे)
- न्यु सम्राट हॉटेल
- हॉटेल ताजमहाल
- शिव डेअरी
याशिवाय सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही हॉटेल्स व खाद्य दुकानांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)
50.65 लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त
तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना अनेक ठिकाणी संशयित भेसळयुक्त, अयोग्यरीत्या साठवलेले आणि चुकीचे लेबलिंग केलेले खाद्यपदार्थ आढळून आले. 12 आस्थापनांमधून एकूण 50 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या पदार्थांची यादी
तपासणी पथकाने तूप, गूळ, संशयित भेसळयुक्त पांढरी साखरेची पावडर, म्हशीचे दूध, पाम तेल, दही, पनीर, चकली, फरसाण, सुका मेवा, सोनपापडी, टोस्ट, बिस्किटे आणि मलाई कुल्फी यांचा साठा जप्त केला आहे. हा सर्व साठा अधिकृत ताब्यात घेण्यात आला असून, प्रयोगशाळेतील चाचणी अहवाल आल्यानंतर पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एफडीएने स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world