जाहिरात

Pune Gangwar: गोळ्या घातल्या, कोयत्याने वार अन् जागीच मृत्यू! भरदिवसा गँगवॉर भडकलं,टोळीयुद्धामुळे पुण्यात दहशत

Pune Gangwar: पुण्यातील धनकवडी येथील बालाजीनगर बस स्टँड परिसरात वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची डोक्यात 3 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

Pune Gangwar: गोळ्या घातल्या, कोयत्याने वार अन् जागीच मृत्यू! भरदिवसा गँगवॉर भडकलं,टोळीयुद्धामुळे पुण्यात दहशत
"Pune Gangwar News: पुण्यात भरदिवसा गँगवॉर भडकलं"
NDTV Marathi

- अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी

Pune Gangwar News: पुण्यातील टोळीयुद्ध (Pune Gangwar) पुन्हा एकदा अतिशय रक्तरंजित वळणावर आल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्याच्या धनकवडी परिसरातील बालाजीनगर येथे बुधवारी (20 मे) भरदिवसा एका तरुणाची डोक्यात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय उर्फ बाळा मस्के असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 20 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अक्षय हा काही महिन्यांपूर्वी झालेल्या वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील एका मुख्य आरोपीचा सख्खा भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा हल्ला आंदेकर आणि कोमकर टोळीतील जुन्या वैमनस्यातून तसेच टोळीयुद्धातूनच (गँगवॉर) झाल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बस स्टँडजवळ थरार: डोक्यात झाडल्या 3 गोळ्या

ही धक्कादायक घटना बालाजीनगर येथील बस स्टँड परिसरात घडली. अक्षय मस्के हा परिसरात असताना चार हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी अक्षयवर अतिशय जवळून गोळीबार केला. यातील तब्बल तीन गोळ्या थेट अक्षयच्या डोक्यात घातल्या. गोळीबार करूनच हल्लेखोर थांबले नाहीत, तर त्यांनी अक्षयवर कोयत्यानेही सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अक्षय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

(नक्की वाचा : Pimpri Chinchwad: 'माझ्या पत्नीशी का बोलतोस?' संशयातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला)

आंदेकर टोळीकडून 'रिप्लाय' दिल्याचा संशय

पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर आंदेकर टोळी शांत बसली नव्हती. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच आंदेकर टोळीतील गुंडांनी हा गोळीबार करून 'रिप्लाय' दिल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भरचौकात गोळ्या झाडल्यानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

(नक्की वाचा: Pune News : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भयंकर घडलं; डोळ्यांच्या उपचारादरम्यान 6 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू)

घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने बालाजीनगर येथे दाखल झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. गँगवॉरच्या पार्श्वभूमीवर बालाजीनगर आणि आसपासच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com