Pune News: लोणावळ्यात खळबळ! पत्नी-मित्रांना मेसेज अन्... लायन्स पॉईंटवर IT इंजिनिअरचं टोकाचं पाऊल

Pune News: लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे 32 वर्षीय आयटी अभियंत्याने 250 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे ही घटना घडली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Photo (Google Gemini)

सूरज कसबे, पुणे

Pune News: लोणावळ्यातील निसर्गरम्य लायन्स पॉईंट येथे पुन्हा एकदा एका हृदयद्रावक घटनेची नोंद झाली आहे. पुण्यातील बाणेर येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 32 वर्षीय विरेंद्र सिन्हा यांनी २५० फूट खोल दरीत उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मेसेज आणि ई-मेलद्वारे दिले होते संकेत

मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र सिन्हा यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास आपली चारचाकी गाडी लायन्स पॉईंट येथे उभी केली होती. आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नीला आणि मित्रांना ई-मेल व मेसेजद्वारे काही संकेत दिले होते. या माहितीनंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)

विरेंद्र सिन्हा यांची शोधमोहीम

ज्या ठिकाणी गाडी पार्क होती, त्याच्या बरोबर समोरच्या दरीत शोध घेण्यात आला. सुमारे २५० फूट खोल दरीत विरेंद्र यांचा मृतदेह आढळून आला. सायंकाळी 4.30 च्या सुमारास अत्यंत कठीण परिस्थितीत बचाव पथकाने जीवाची पर्वा न करता मृतदेह दरीतून वर काढला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Death: पटेल, तटकरे, अरोरा... रोहित पवार नाव न घेता स्पष्टच बोलले, नव्या दाव्यांनी खळबळ)

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लायन्स पॉईंट येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते, मात्र अलीकडच्या काळात येथे आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मावळ मनसेने प्रशासनाकडे तातडीने येथे कडक सुरक्षा उपाययोजना आणि रेलिंग बसवण्याची मागणी केली आहे. विरेंद्र सिन्हा यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article