रामराजे शिंदे, नवी दिल्ली
अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राजकारण तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अनेक खळबळजनक दावे केले आहेत. अजित पवारांचा मृत्य अपघात नसून घात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवारांनी 'घातपाताचा' संशय व्यक्त करत अनेक कड्या जोडण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांनी कुणाचंही थेट नाव न घेता अनेक गोष्टी स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांच्या बोलण्यात प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा यांची नाव अप्रत्यक्षरित्या आली आहेत. मात्र रोहित पवारांनी कुणावरही थेट आरोप केले नाहीत.
फाईलवर सही आणि विमानाचे 'लास्ट मिनिट' बुकिंग
रोहित पवार यांनी अपघाताच्या दिवशीच्या घडामोडींचा क्रम लावत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. एका मोठ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अजितदादांनी एका फाईलवर तातडीने सही केली. जर त्यांना विमानानेच जायचे असते, तर बुकिंग आधीच झाले असते. मात्र, विमानाचे बुकिंग आदल्या दिवशी 7.13 वाजता झाले, जे संशयास्पद आहे. अजित पवार यांना फाईलवर सहीसाठी कुणाचे फोन आले होते याबाबत अजितदादांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव काही नावे (प्रफुल पटेल) घेतली आहेत. विमानाच्या प्रमुख पायलटने मागील महिनाभरात कोणाकोणाची भेट घेतली, याची माहिती सार्वजनिक झाली पाहिजे.
राजकीय कन्सल्टंट आणि कोट्यवधींचे कंत्राट
रोहित पवारांनी या प्रकरणात एका राजकीय कन्सल्टंटच्या भूमिकेवर बोट ठेवले आहे. अजितदादांची भूमिका शेकडो कोटींचे एका राजकीय कन्सल्टंटचे कंत्राट रद्द करण्याची होती. याच मुद्द्यावरून पक्षात वादविवाद झाले असावेत. योगायोगाने याच कन्सल्टंटने गेल्या काही महिन्यात एक विमान देखील विकत घेतले आहे, असं रोहित पवारांनी सांगितलं.
पाहा VIDEO
नरेश अरोरा कनेक्शन
बारामती हॉस्टेलवर अजितदादांनी नरेश अरोराच्या लोकांना झापले होते. तरी देखील कंत्राट कायम ठेवून पैसे देण्याबाबत काही नेत्यांचा (कदाचित सुनील तटकरे) आग्रह होता, असा दावाही रोहित पवारांनी केला आहे.
'ब्लॅक बॉक्स' आणि तांत्रिक तपास
अपघाताचा तपास पारदर्शक व्हावा यासाठी रोहित पवारांनी काही मागण्या केल्या आहेत. ब्लॅक बॉक्स कधीही स्वतःहून बंद करता येत नाही. जर तो बंद असेल, तर याचा अर्थ तो मुद्दाम निकामी केला गेला असावा. डीजीसीएचा तपास सुरू असला तरी, एका महिन्याच्या आत आंतरराष्ट्रीय एजन्सीद्वारे या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला पाहिजे. हा केवळ अपघात नसून यात गुन्हेगारी स्वरूपाचा कट असू शकतो, याची पडताळणी होणे आवश्यक आहे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
"अजितदादांच्या बाबतीत घात झाला की अपघात, याकडे सत्ताधारी नेत्यांचे लक्ष नाही. पण आम्ही सत्याचा पाठपुरावा सोडणार नाही," असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world