Pune Crime News: शेअर बाजारामध्ये कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी पुण्यातील एका 46 वर्षीय आयटी व्यावसायिकाला तब्बल 4 कोटी 43 लाख रुपयांना लुबाडले आहे. सायबर चोरट्यांनी यासाठी बनावट व्हॉट्सॲप ग्रुप आणि एका बोगस ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर केला होता. या फसवणूक प्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पिंपरी चिंचवड येथील सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडिया पोस्टवरून रचला विळखा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आयटी व्यावसायिक एका सोशल मीडिया पोस्टच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. हा ग्रुप शेअर मार्केट संदर्भात सल्ला देणारा प्लॅटफॉर्म असल्याचे भासवत होता. विशेष म्हणजे, गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी या सायबर टोळीने एका नामांकित आंतरराष्ट्रीय बँकिंग संस्थेच्या नावाचा गैरवापर केला होता.
पहाटे 6.30 चे ऑनलाईन क्लासेस
गुन्हेगारांनी विश्वास वाढवण्यासाठी एक हुशार रणनीती आखली होती. या ग्रुपवर दररोज पहाटे 6.30 वाजता ऑनलाईन सेशन्स घेतली जात असत. यामध्ये शेअर बाजार, गुंतवणुकीच्या धोरणांचे धडे आणि भरपूर नफा देणाऱ्या शेअर्सची माहिती दिली जात असे. या ग्रुपचा ॲडमिन स्वतःची ओळख 'मायरा' अशी करून देत असे आणि ती एक गुंतवणूक तज्ज्ञ असल्याचा दावा करत सदस्यांशी संवाद साधायची. इतर गुंतवणूकदारांना झालेला कोट्यवधींचा नफा दाखवणारे बनावट स्क्रीनशॉट्स सतत ग्रुपवर शेअर करून पीडित व्यक्तीला जाळ्यात ओढण्यात आले.
(नक्की वाचा- Pune Crime: PSI असल्याचं भासवण्यासाठी वर्दी घातली, पण एक बारीक चूक अन् अधिकाऱ्याच्या हुशारीने महिलेचा पर्दाफाश)
ॲपवर दिसत होता 26.64 कोटींचा नफा
'मायरा' आणि तिच्या टोळीच्या सांगण्यावरून पीडित आयटी इंजिनिअरने ग्रुपमध्ये दिलेल्या एका लिंकवरून ट्रेडिंग ॲप डाऊनलोड केले आणि तिथे खाते उघडले. अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत त्याने एकूण 34 व्यवहारांद्वारे तब्बल 4 कोटी 43 लाख रुपये सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर केले.
त्या बनावट ॲपच्या डॅशबोर्डवर पीडित व्यक्तीची गुंतवणूक वाढून तब्बल 26 कोटी 64 लाख रुपये इतका परतावा दिसत होता. हा प्रचंड नफा पाहून पीडित व्यक्तीला आनंद झाला. मात्र जेव्हा त्याने हे पैसे बँकेत काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खरी फसवणूक समोर आली.
(नक्की वाचा- Iran-Israel War: जगाची चिंता वाढली, युद्ध पुन्हा भडकणार? इराणचा इस्रायलवर शक्तीशाली हल्ला)
पैसे काढताना मागितली आणखी रक्कम
पीडित व्यक्तीने जेव्हा पैसे काढण्याची विनंती केली, तेव्हा सायबर भामट्यांनी विविध करांचे आणि शुल्काचे कारण पुढे करत आणखी पैशांची मागणी सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने तात्काळ पोलिसात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world