जाहिरात

Pune News : धरणे तुडुंब मात्र कोथरूड 4 दिवस कोरडेठाक, आंघोळीचे वांदे झाल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेला दांड्या

Kothrud Water Problem: संपूर्ण कोथरूडमध्ये हीच परिस्थिती आहे. पाणीपुरवठा विभागाला फोन केल्यावर 'व्हॉल्व्ह रिपेअर करण्याचे काम सुरू आहे' असे उत्तर मिळते, असे एका स्थानिक तरुणाने सांगितले.

Pune News : धरणे तुडुंब मात्र कोथरूड 4 दिवस कोरडेठाक, आंघोळीचे वांदे झाल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेला दांड्या
पुणे:

रेवती हिंगवे

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पुण्यातील कोथरूड भागातील नागरिकांना गेल्या 4 दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. इथल्या शास्त्रीनगर परिसरातील गुरूजन सोसायटीमध्येही इतर भागांप्रमाणे पाणीपुरवठा अनियमित असून, येणारे पाणीही कमी दाबाने आणि अस्वच्छ येत असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. कोथरूडमधील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या भागात पाणीच आलेले नाही. जे काही पाणी येते, ते अत्यंत कमी दाबाने येते आणि तेही दिवसातून फक्त एकदाच. पाणी येण्याची वेळ निश्चित असली तरी, ते कधीही अचानक बंद होते, ज्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत अशी तक्रार इथल्या नागरिकांनी केली आहे.

( नक्की वाचा: एसी बसने लोणावळा टूर, तिकीट फक्त 500 रुपये; पटकन करा प्लॅनिंग )

आजारपणा, अंगाला वास येत असल्याने शाळेला दांड्या

या भागातील पाणी अत्यंत घाण आणि गढूळ असते. यामुळे लहान मुले वारंवार आजारी पडत आहेत आणि त्यांना बरे होण्यासाठी महिनाभर लागतो. वारंवार आजारी पडल्याने मुलांच्या शाळांना सुट्ट्या पडत आहेत, ज्यामुळे त्यांना परीक्षांना बसू दिले जात नाही, अशी गंभीर समस्या पालकांनी मांडली आहे. एका रहिवाशाने सांगितले की, गुरुवारी पाणी येणार नाही असे सांगण्यात आले, शुक्रवारी कमी दाबाने आले आणि शनिवारी तर पाणीच सोडले नाही. यामुळे अनेकांनी आंघोळी केल्या नाहीत आणि कपडे धुतलेले नाही. मुबलक पाणी मिळेल या आशेने धुण्यासाठीचे कपडे साचवून ठेवल्याचे इथल्या महिलांनी सांगितले. 

( नक्की वाचा: 'बँक ऑफ बडोदा'च्या मॅनेजरने बँकेतच संपवलं आयुष्य; सुसाइड नोटही सापडली )

व्हॉल्व्ह रिपेअर करायला 4 दिवस लागतात ?

संपूर्ण कोथरूडमध्ये हीच परिस्थिती आहे. पाणीपुरवठा विभागाला फोन केल्यावर 'व्हॉल्व्ह रिपेअर करण्याचे काम सुरू आहे' असे उत्तर मिळते, असे एका स्थानिक तरुणाने सांगितले. पाण्याची समस्या इतकी गंभीर झाली आहे की, काही मुलांनी पाणी नसल्यामुळे दोन दिवसांपासून आंघोळ केली नाही आणि शाळेतही गेले नाही, असे स्वतः मुलांनी सांगितले आहे. धरणांमध्ये पाणी असूनही, स्थानिक प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com