जाहिरात

Pune News: सियानं पळून जाऊन लग्न का केलं नाही? एका भीतीने 20 वर्षांची मुलगी बनली क्रूर खुनी

Ketan Agarwal murder case: सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते आणि तिचे चेतनवर प्रेम होते, तर त्या दोघांनी पळून जाऊन लग्न का केले नाही?

Pune News: सियानं पळून जाऊन लग्न का केलं नाही? एका भीतीने 20 वर्षांची मुलगी बनली क्रूर खुनी
Ketan Agarwal murder case: सिया आणि चेतन यांनी पळून जाऊन लग्न का केलं नाही?
पुणे:

Ketan Agarwal murder case: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यूप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. सुरुवातीला लोहगड किल्ल्यावरील ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक अतिशय क्रूर आणि पूर्वनियोजित खून होता, हे पोलिसांनी आधीच स्पष्ट केले आहे. 

याप्रकरणी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या 29 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या संपूर्ण प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक  खुलासा समोर आला आहे, ज्याने पोलिसांनाही चकीत केले आहे. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते आणि तिचे चेतनवर प्रेम होते, तर त्या दोघांनी पळून जाऊन लग्न का केले नाही? त्यांनी केतनचा काटा काढण्याचा इतका भयानक मार्ग का निवडला? या प्रश्नाचे उत्तर आता पोलीस तपासात उघड झाले आहे.

का घेतला टोकाचा निर्णय?

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिने केवळ कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी आणि समाजात होणाऱ्या बेइज्जतीला घाबरून चेतनसोबत पळून जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. अवघ्या 20 वर्षांची असलेली सिया केतन अग्रवालसोबत झालेला तिचा साखरपुडा  मोडण्याच्या आणि चेतनसोबत घर सोडून जाण्याच्या बाजूने अजिबात नव्हती. 

सियानं साखरपुडा मोडला असता किंवा ती चेतनसोबत पळून गेली, तर तिच्या कुटुंबाची समाजात मोठी बदनामी होईल आणि त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसेल, अशी भीती तिला सतावत होती. लोकांना तोंड दाखवणे कठीण होईल, याच एका विचाराने तिने पळून जाण्याचा सोपा मार्ग नाकारला.

( नक्की वाचा : Pune News: केतन अग्रवाल हत्याकांडावर आरोपी चेतन चौधरीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया; प्रकरणाला वेगळंच वळण )

प्रियकर चेतन चौधरीचा मोठा खुलासा 

पोलीस कोठडीत असलेल्या चेतन चौधरीने चौकशीदरम्यान या संपूर्ण कटकारस्थानाचा उलगडा केला आहे. चेतनने पोलिसांना सांगितले की, त्या दोघांनीही घर सोडून एकत्र पळून जाण्याच्या पर्यायावर अनेकदा चर्चा केली होती. मात्र, सिया या गोष्टीसाठी कोणत्याही परिस्थितीत तयार नव्हती. 

केतनशी ठरलेले लग्न मोडल्यास किंवा पळून गेल्यास आई-वडिलांची मान समाजात खाली जाईल, असे तिला वाटत होते. पोलिसांच्या मते, याच एका विचित्र मानसिकतेतून आणि भीतीपोटी त्या दोघांनी मिळून केतन अग्रवाललाच कायमचे रस्त्यातून हटवण्याचा म्हणजेच त्याची हत्या करण्याचा अत्यंत थरारक आणि क्रूर प्लॅन आखला.

( नक्की वाचा : Pune News : हत्येनंतर 4 दिवस सुरु होतं कपटी सियाचं नाटक... केतनच्या बहिणीनं पकडलं खोटं, वाचा नेमकं काय घडलं? )
 

 'हुडी' ठरले कारण

लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचा दावा सुरुवातीला सियाने केला होता. मात्र, पोलिसांनी जेव्हा किल्ल्याच्या तिकीट काउंटरवरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा त्यांना एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा मिळाला. सीसीटीव्हीमध्ये एक संशयित तरुण चेहऱ्यावर हुडी घालून आणि कानात हेडसेट लावून केतन आणि सियाच्या मागे जात असताना दिसला. एका फुटेजमध्ये सिया अचानक मागे वळून पाहते आणि तो तरुण तातडीने खाली बसतो, असे दिसून आले. 

या हालचालीमुळे पोलिसांचा संशय बळावला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तिथे प्रचंड उकाडा होता आणि तापमान सुमारे 33 डिग्री सेल्सिअस होते. अशा कडक उन्हात एखाद्या व्यक्तीने हुडी घालून फिरणे पोलिसांना खटकले आणि याच हुडीने संपूर्ण गुन्ह्याचा पर्दाफाश केला.

( नक्की वाचा : Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची विकेट काढायला गोळा केले 250 कोटी! धक्कादायक आरोपाने विधानसभा हादरली )
 

29 जूनपर्यंत पोलीस कोठडी

तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हुडी घातलेल्या त्या संशयित तरुणाची ओळख चेतन चौधरी म्हणून पटवली. सिया आणि चेतन या दोघांनी मिळूनच केतनच्या हत्येचा पूर्ण कट रचल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले. त्यानंतर न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी एका निष्पाप तरुणाचा जीव घेणाऱ्या या प्रियकर-प्रेयसीची पोलीस आता कसून चौकशी करत असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com