
राहुल कुलकर्णी, पुणे
Pune News : महिलांवर अत्याचाराच्या घटना मागील काही दिवसात हगवणे प्रकरणानंतर अधोरेखित झाल्या आहेत. पुणे महानगरपालिकेत देखील महिला अधिकाऱ्यांचा मानसिक छळ आणि त्रास दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात महापालिका अधिकाऱ्यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांनी याबाबत महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तक्रारीत त्यांना भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीची गंभीर दखल घेत आयोगाने पुणे महानगरपालिकेकडे स्पष्टीकरण मागवले आहे.
महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या लेखी तक्रारीनुसार, संबंधित पदाधिकारी त्यांच्या कामात सतत हस्तक्षेप करत असून त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही मांडले होते. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
महिला अधिकाऱ्यांच्या या तक्रारीची महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महापालिका आयुक्तांशी संपर्क साधत या प्रकरणाची चौकशी करून तातडीने योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना बळीवंत यांनी देखील चौकशी करून अहवाल सादर केला आहे.
याशिवाय महापालिकेतील इतर महिला कर्मचाऱ्यांनीही यासंबंधी तक्रारी केल्याची माहिती मिळते. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केल्याचे समजते आहे. त्यामुळे येत्या काळात महिला अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या या भाजप पदाधिकाऱ्याविरोधात काय कारवाई होते हे पाहावं लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world