सूरज कसबे, पुणे
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आणि आयटी हबला जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणाऱ्या पुणे मेट्रो लाईन-3 बाबत एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील पहिल्या 13.3 किलोमीटरचा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अनिलकुमार सैनी यांनी ही माहिती दिली आहे.
पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण
शिवाजीनगर ते हिंजवडी हा संपूर्ण मार्ग 23 किलोमीटरचा असून त्यावर एकूण 23 स्टेशन आहेत. मात्र, पहिल्या टप्प्यात आर. के. लक्ष्मण ते मान या 13.3 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो धावणार आहे. या टप्प्यातील सर्व 12 मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ट्रॅक टाकणे, थर्ड रेल विद्युतीकरण आणि सिग्नल प्रणालीचे कामही यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
(नक्की वाचा- Shiv Sena UBT Crisis: उद्धव-आदित्य ठाकरे गप्प, संजय राऊतांची बॅटिंग; ठाकरे गटात नेमकं काय सुरुये?)
प्रवासाचा वेळ थेट अर्ध्यावर
हिंजवडी आयटी पार्क परिसरामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज लाखो नागरिक आणि आयटी व्यावसायिक प्रवास करतात. त्यामुळे या भागात दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सध्या शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवासासाठी किमान दीड तास लागतो. परंतु, ही मेट्रो सुरू झाल्यावर हा वेळ सुमारे 45 मिनिटांनी कमी होणार आहे, ज्यामुळे पुणेकरांचा प्रवास वेगवान आणि सुखाचा होईल.
महिला शक्ती'चे सारथ्य आणि तिकीट दर
या संपूर्ण मेट्रोचे संचालन 100 महिला ट्रेन ऑपरेटर्स करणार आहेत, हे या प्रकल्पाचे मोठे वैशिष्ट्य आहे. पुणेकरांच्या खिशाचा विचार करता या प्रवासासाठी किमान 16 रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला असून, याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे.
(नक्की वाचा- Omraje Nimbalkar Exclusive: ओमराजे निंबाळकर शिंदेना धप्पा देणार? पत्रावर सही केली नाही? स्पष्टच बोलले)
प्रकल्पाचा खर्च
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खाजगी संस्थांच्या भागीदारीतून या संपूर्ण मेट्रोच्या बांधणीसाठी सुमारे 8500 कोटी रुपये उभे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर लवकरच उर्वरित मार्गाचे कामही पूर्ण केले जाईल. त्यामुळे आता आयटीयन्स आणि पुणेकरांना पुणेरी मेट्रोमधून प्रवास करण्याचे वेध लागले आहेत.