यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : उन्हाळा सुरू होताच फळांचा राजा असलेल्या 'आंब्याची' लगबग वाढते. यंदा अवकाळी पाऊस झाल्यामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे यंदा आंबा महाग असल्याचं दिसून येत आहे. अशी पार्श्वभूमी असताना पुण्यात आंबेचोरांचा सुळसुळाट झाला आहे. पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील येवलेवाडी येथे एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका आंब्याच्या दुकानातून तब्बल ३३ पेटी आंबे पळवून नेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आंबे सांभाळून ठेवा, पुण्यात फिरतेय आंबेचोरांची टोळी...
मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी ११ एप्रिल रोजी रात्री २ ते सकाळी ६ च्या दरम्यान घडली. कात्रज-कोंढवा रोडवर एका प्रसिद्ध हॉटेलच्या शेजारी आंब्याचं दुकान थाटण्यात आलं होतं. विक्रीसाठी आणलेले आंबे सुरक्षित राहावेत म्हणून व्यापाऱ्याने या मोकळ्या जागेत कापडी मांडव घातला होता. मात्र, रात्रीच्या शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूने प्रवेश केला. चोरट्यांनी अत्यंत शिताफीने मांडव फाडला आणि आत प्रवेश करून तिथे ठेवलेल्या १ लाख ८ हजार रुपये किमतीच्या तब्बल ३३ पेटी आंब्यांवर डल्ला मारला.
धक्कादायक बाब म्हणजे, या परिसरात दुकान लावल्यानंतर चोरी होण्याची ही दुसरी वेळ आहे. वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे स्थानिक व्यापारी आणि विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकाच ठिकाणाहून दोनदा माल चोरीला गेल्याने, ही चोरी कोणी ओळखीच्या व्यक्तीने किंवा पाळत ठेवून केली आहे का? असा संशय आता व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्याने येवलेवाडी पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे. पोलीस परिसरातील हॉटेल आणि मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. चोरीच्या पद्धतीवरून हा प्रकार सराईत गुन्हेगारांचा आहे की स्थानिक टोळीचा, याचा शोध पोलीस घेतला जात आहे. सध्या पुण्यात आंब्याचे भाव कडाडलेले असताना, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर आंब्यांची चोरी होणे ही चर्चेची बाब ठरली आहे. येवलेवाडी पोलीस या 'आंबे चोरांचा' छडा लावण्यात यशस्वी ठरतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.