यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात मोठ्या संख्येने तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी येत असतात. पुणं ही विद्यार्थ्यांसाठी पंढरी मानली जाते. मात्र येथेच विद्यार्थ्यांना लुबाडल्याची घटना घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही घटना पुणे शहरातील झेड ब्रिजवर घडली आहे. झेड ब्रिजवर मोठ्या संख्येने तरुण-तरुणी फिरायला येत असतात. अनेकदा मुलांचा ग्रुप इथं गप्पा ठोकत तासन् तास बसतात. येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एक तरुण आणि तरुणीला अडवून लुबाडल्याची घटना घडली आहे.
झेड ब्रिजवर नेमकं काय घडलं?
पुण्यातील डेक्कन बस स्टॉपजवळील झेड ब्रिजवर मॉर्निंग वॉकला आलेल्या भावा-बहिणीला धमकावुन लुबाडण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. तो आणि त्याची मावस बहीण शुक्रवारी १० एप्रिल रोजी पहाटे पाचच्या सुमारास झेड ब्रीजवरून खालील नदीपात्रातील रस्त्याने निघाले होते. त्यावेळी काही तरुण दुचाकीवरुन तेथे आले. तरुणाला आणि त्याच्या मावस बहिणीला कोयत्याचा धाक दाखविला आणि तरुणाला धमकावून पैसे मागितले. तरुणाच्या मोबाईलमधील फोन पेवरुन ऑनलाईनने रत्नागिरीत राहणाऱ्या आरोपीच्या बहिणीच्या खात्यावर जबरदस्तीने १ हजार रुपये ट्रान्सफर करायला लावले. त्यांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. यानंतर तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी पहाटेच्या वेळची परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यातून आरोपींची नावे निष्पन्न करुन दोघांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील तपास करत आहेत.
दोघांना अटक...
स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या भाऊ-बहिणीला धमकावून ऑनलाईन लुटणार्या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. निखिल संदीप जाधव (वय २०, मारुती मित्र मंडळाजवळ, जनता वसाहत), ओंकार रमेश गरुड (वय २१, रा. महात्मा फुले वाड्याजवळ, महात्मा फुले पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. याबाबत नागेश हनंमत पाटील (वय २१, रा. राज सगमवाडी मठ, पेरुगेट पोलीस चौकीजवळ, सदाशिव पेठ) डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world