Pune News: पुण्याच्या कात्रज-देहू रोड बायपासवर शुक्रवारी पहाटे एका ट्रक चालक आणि क्लीनरला अमानुष वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या काही व्यक्तींनी या दोघांना केवळ मारहाणच केली नाही, तर त्यांना जबरदस्तीने शेण खाण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कराड येथील मुस्लीम समाजातील एक ट्रक चालक आणि क्लीनर आपल्या ट्रकमधून चार म्हशी घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांच्याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांची रीतसर परवानगी होती. तरीही, संशयितांनी ट्रक अडवून ते बेकायदेशीरपणे गायींची कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याचा खोटा आरोप केला. आरोपींनी ट्रक चालक आणि क्लीनरला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि त्यांना जमिनीवर पडलेले शेण खाण्यास लावले.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा)
पोलिसांनी स्वतःहून दाखल केला गुन्हा
सुरुवातीला पीडितांनी केवळ मारहाणीची तक्रार दिली होती, मात्र त्यात शेण खाण्यास लावल्याचा उल्लेख नव्हता. आरोपींनी स्वतः या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ एका पोलीस कॉन्स्टेबलच्या नजरेस पडला. आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले की, "व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्ही रविवारी स्वतःहून तक्रार नोंदवून घेतली आणि दोन पुरुष व एका तृतीयपंथी व्यक्तीला अटक केली आहे." टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कुणाला संधी?)
माणुसकीला काळिमा फासणारी घटना
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रीतसर कागदपत्रे असतानाही केवळ संशयावरून अशा प्रकारे अमानुष वागणूक देणे, हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.