Bhigwan Kidnapping Case: भिगवण अपहरण प्रकरणात भाजप आमदाराचा हात? मुलीच्या आईचे गंभीर आरोप

Bhigwan Kidnap Girl Case Update:भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणी बारामती पोलिसांत हजर झाली असली तरी, तिच्या नातेवाईकांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

देविदास राखुंडे, बारामती

पुण्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील 21 वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणाने आता एक नवे आणि वादळी वळण घेतले आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. मात्र तरुणीचा आई आणि नातेवाईकांनी 'मुलीवर दबाव' असल्याचा आरोप करत दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

न्यायालयाच्या आवारात 'मुर्दाबाद'च्या घोषणा

संबंधित तरुणीला जबाब नोंदवण्यासाठी बारामती सत्र न्यायालयात नेले असता, त्या ठिकाणी तिच्या नातेवाईकांनी मोठा गदारोळ केला. जहीर हारून शेख याचा चुलता अजहर शेख हा आमदार राहुल कुल यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. "राहुल कुल मुर्दाबाद" अशा घोषणा देत नातेवाईकांनी न्यायालयाचा परिसर दणाणून सोडला. आमदारांच्या पाठबळामुळेच आरोपींनी हे धाडस केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

(नक्की वाचा- Pune Bhigwan Case: तरुण- तरुणी पोलिसात हजर; मुलीने सत्य सांगितलं...)

"माझ्या मुलीवर दबाव आहे" – आईचा आक्रोश

तरुणीने 'मी स्वमर्जीने आले आहे' असा व्हिडिओ प्रसिद्ध केला असला, तरी तिची आई हे मान्य करायला तयार नाही. "माझ्या मुलीला वडील नाहीत. आरोपींनी तिला तिच्या भावांना मारून टाकण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे ती दबावाखाली येऊन हे सांगत आहे," असे तिच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणात आमदार राहुल कुल यांचा CDR (कॉल डिटेल रेकॉर्ड) काढला जावा, अशी मागणीही मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.

Pune News : भिगवणमधील वातावरण चिघळलं; अपहरण झालेल्या मुलीचा Video समोर आला अन् प्रकरणात मोठा ट्विस्ट

काय आहे मूळ प्रकरण?

17 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 च्या सुमारास ही तरुणी तिच्या आई आणि भावासोबत लग्नाची खरेदी करून परतत असताना, दोन भावांनी (जहीर आणि आयान शेख) आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिचे अपहरण केले होते. या घटनेनंतर भिगवणमध्ये बंद पुकारण्यात आला होता आणि हिंदू संघटनांनी 'जन आक्रोश मोर्चा' काढला होता.

Advertisement

मुलाचा चुलता अजहर शेख याचे सोशल मीडिया स्टेटस आणि आमदारांसोबतचे फोटो आता या प्रकरणात चर्चेचा विषय ठरले आहेत. पोलीस आता या प्रकरणाची राजकीय कोनातूनही चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.