जाहिरात

Nashik News :नाशिक TCS च्या इंजिनिअरला 'शीरखुरमा'तून दिले अंमली पदार्थ? धर्मांतरासाठी काळ्या जादूचा वापर!

Nashik TCS Case: नाशिकमधील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसमध्ये (TCS) धर्मांतराच्या प्रकरणाने आता एक धक्कादायक वळण घेतले आहे

Nashik News :नाशिक TCS च्या इंजिनिअरला 'शीरखुरमा'तून दिले अंमली पदार्थ? धर्मांतरासाठी काळ्या जादूचा वापर!
Nashik News : या कर्मचाऱ्याला 'शीर खुरमा' खायला देण्यात आला. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

सुजाता द्विवेदी, प्रतिनिधी

Nashik TCS Case: नाशिकमधील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसमध्ये (TCS) धर्मांतराच्या प्रकरणाने आता एक धक्कादायक वळण घेतले आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये 'शीर खुरमा'मधील नशा आणि मोबाईल अनलॉक करण्यासाठी 'फेस स्कॅन'चा अडथळा अशा फिल्मी वाटणाऱ्या पण वास्तवातील घटना समोर आल्या आहेत. एका कर्मचाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनी रचलेला हा कट आणि पोलिसांनी केलेला तांत्रिक तपास एखाद्या थ्रिलर कथेलाही मागे टाकेल असा आहे.

शीर खुरमा आणि नशेतून जाळं

या प्रकरणातील तक्रारदार कर्मचाऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या तौसिफ बिलाल अत्तार याने आधी त्याच्याशी मैत्री केली. ईदच्या दिवशी तौसिफच्या घरी गेलेल्या या कर्मचाऱ्याला 'शीर खुरमा' खायला देण्यात आला. तो खाल्ल्यानंतर आपल्याला प्रचंड नशा चढली आणि शुद्ध हरपल्यासारखे वाटू लागले, असा आरोप पीडित कर्मचाऱ्याने केला आहे. 

हा कर्मचारी मानसिक तणावात होता आणि त्याच्या कुटुंबात समस्या होत्या, तेव्हा त्याला 'काळ्या जादू'चे नाव सांगून अध्यात्मिक उपायांच्या नावाखाली जाळ्यात ओढण्यात आले.

( नक्की वाचा : Pune News: हिंजवडीत नाशिक प्रकरणाची पुनरावृत्ती? IT कंपन्यांमधील 'त्या' धक्कादायक प्रकाराची थेट सरकारकडून दखल )

व्यावसायिक अडथळे निर्माण करून दबाव

आरोपींनी केवळ वैयक्तिकच नाही, तर या कर्मचाऱ्याच्या व्यावसायिक आयुष्यातही अडथळे निर्माण केले. पीडित कर्मचाऱ्याने सांगितले की, आरोपींनी त्याच्या वरिष्ठांना त्याच्या कामाबद्दल खोटे आणि नकारात्मक अहवाल पाठवले. यामुळे नोकरी धोक्यात आल्याची भीती निर्माण झाली आणि कर्मचाऱ्याची आरोपींवरील अवलंबित्व वाढली. याच दबावाचा फायदा घेत त्याला विशिष्ट धार्मिक चिन्हे परिधान करण्यास भाग पाडले गेले आणि त्याचे चित्रीकरण करण्यात आले.

व्हॉट्सॲप ग्रुप आणि फोटोचा पुरावा

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे. पीडित कर्मचाऱ्याचा विशिष्ट धार्मिक पेहरावातील फोटो 'TCS Nashik' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अपलोड करण्यात आला होता. हा फोटो 'धर्मांतर' प्रक्रिया पूर्ण झाल्याचे दाखवण्यासाठी वापरला गेल्याचा पोलिसांचा संशय आहे. याशिवाय, ज्या दुकानातून धार्मिक टोपी खरेदी करण्यात आली आणि कर्मचाऱ्याला फिरवण्यासाठी ज्या स्विफ्ट कारचा वापर झाला, तिचा शोध पोलीस घेत आहेत.

( नक्की वाचा : नाशिकची 'ती' बडी कंपनी 'कॉर्पोरेट जिहाद' चा अड्डा ! मशिदीत ट्रेनिंग ते ऑफिसमध्ये बीफ, वाचा हादरवणारी माहिती )

फेस आयडीचा अडथळा आणि तांत्रिक यश

या तपासातील सर्वात मोठा अडथळा तांत्रिक होता. मुख्य आरोपी दानिश शेख याने आपल्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲप्लिकेशनला स्वतंत्र पासवर्ड आणि 'फेस आयडी' लॉक लावला होता. यामुळे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (RFSL) माहिती मिळवणे कठीण झाले होते. 

अखेर विशेष न्यायालयाच्या परवानगीने, एसआयटीने (SIT) आरोपीला प्रयोगशाळेत नेले आणि त्याच्या 'फेस आयडी'चा वापर करून मोबाईल अनलॉक केला. यामुळे तपासासाठी महत्त्वाचा डेटा पोलिसांच्या हाती लागला आहे.

धर्मांतराच्या या प्रकरणासोबतच कंपनीतील काही महिला कर्मचाऱ्यांनीही आपल्या सहकाऱ्यांवर छळाचे आरोप करत तक्रारी दाखल केल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 9 एफआयआर दाखल झाले आहेत. टीसीएस कंपनीने या सातही आरोपींना निलंबित केले आहे. मुंबई नाका पोलिसांनी तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या चार मुख्य आरोपींचा ताबा घेतला असून न्यायालयाने त्यांना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com