राहुल कुलकर्णी
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर हुंडाबळीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वैष्णवीच्या लग्नातही तिच्या आई वडीलांनी काही कमी केली नव्हती. मुलीसाठी त्यांनी हवं ते केलं होतं. सासरच्यांनी जे काही मागितलं ते प्रत्येक गोष्ट त्यांनी देवू केली. लग्नाचा खर्चच नाही तर, दागिने, गाड्या,यासह बरच काही त्यांनी आपल्या लेकीसाठी दिलं. त्यांनी दिलेला हुंडा आणि लग्नासाठी केलेला खर्च याचे आकडे आता समोर आले आहेत. हा हुंडा आणि खर्च पाहून तुमचेही डोळे फिरल्या शिवाय राहणार नाही. ऐवढं करून ही वैष्णवीला आपला जीव गमवावा लागला.
आलीशान वेडिंग डेस्टिनेशन, भपकेबाज डेकोरेशन, चकाचक सेलिब्रेशन, वैष्णवी हगवणे आणि शशांक हगवणेच्या लग्नाचा भपकेबाजपणा आता समोर येत आहे. पण या भपकेबाजपणावर केलेल्या खर्चाचे आकडे ही आता समोर आले आहेत. हे आकडे हैराण करणारे आहेत. लग्नाच्या रिसॉर्टसाठी 10 लाख, स्टेजच्या सजावटीवर 22 लाख रुपये खर्च करण्यात आले. त्याच बरोबर लग्नातले आमंत्रित पाच हजार होते. पाहुण्यांच्या अहेरासाठी ही लाखोंचा खर्च करण्यात आला. जेवणावळीवर 50 लाख, इव्हेंट मॅनेजमेंटसाठी लाखो रुपये दिले गेले. लग्नाच्या एका दिवसात एकूण 1 कोटी 50 लाख रुपये झाला.
पण लग्नाची तयारी म्हणजे दागदागिने, कपडेलत्ते, मानपान, अहेर आणि हुंडा यावरचा खर्च वेगळा आहे. कस्पटे कुटुंबानं हगवणे कुटुंबाला हुंड्यामध्ये 51 तोळे सोनं दिलं होतं. त्याची किंमत जवळपास 50 लाख होती. त्याच बरोबर 7 किलो चांदीची भांडी, त्याची किंमत 6 लाख रुपये होती. शिवाय फॉर्च्युनर कार ही देण्यात आली. त्याची किंमत तब्बल 50 लाख रुपये आहे. फोर व्हिलर बरोबरच अॅक्टिव्हा स्कूटी ही देण्यात आली. ती 1 लाख रुपयांची होती. हगवणेंनी त्यांच्या ऑफिसचं इंटेरियर ही कस्पटे कुटुंबाकडून करून घेतलं. त्यासाठी 20 लाख खर्च आला. चांदीची गौरी 1 लाख, जावयाला अंगठी 1 लाख, जावयाला आयफोन 1.5 लाख असा एकूण हुंडा 1 कोटी 50 लाख रुपयांचा दिला गेला. हा लग्नाच्या खर्चा व्यतिरीक्त होता.
हे पाहाता हुंड्याचा हव्यास आणि खोट्या प्रतिष्ठेपायी मुलींच्या कुटुंबांची लूट ही कधी थांबणार? पुण्यात सोमवारी मराठा समाज एकवटला होता. त्यांनी या प्रकारांना आळा घालण्यासाठी काही ठराव केले आहेत. हगवणे कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यात घेण्यात आला. शिवाय लग्नात हुंडा घ्यायचा नाही, लग्नात टिळ्याची प्रथा नको, लग्नात भाषणाबाजी नको, साखरपुडा, टिळा एकच दिवशी व्हावा. शिवाय लग्नसोहळा साधेपणाने करणार असे हे ठराव या बैठकीत करण्यात आले. शिवाय हुंडाबळी गेलेल्या घरी रोटी-बेटी व्यवहार होणार नाही, असा मोठा निर्णय ही घेण्यात आला.
पण प्रश्न असा आहे की ठराव करुन हे बदल होणार आहेत का? मुळात खोट्या प्रतिष्ठेचा अट्टाहास लुबाडणुकीचा हव्यास हा कोणत्याही ठरावाने कमी होणार का? होणार असतील, तर नक्की ठराव करा. पण त्या आधी हव्यासाची बिजं आपल्यात रुजणार नाहीत असा समाज घडवण्याचा प्रयत्न करा. बहिणाबाई म्हणून गेल्या आहेत, अरे मानसा मानसा कधी व्हशील मानुस. दुर्दैवाने 100 वर्षांनंतरही हा प्रश्न विचारावाच लागतो.