सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : पिंपरी-चिंचवडमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन (१३ वर्षे) मुलाने भर गर्दीच्या रस्त्यावर चक्क रिक्षा चालवून अनेकांच्या जीवाशी खेळ मांडल्याचं पाहायला मिळतंय. धक्कादायक म्हणजे, या मुलाला रोखण्याऐवजी मागे बसलेली एक व्यक्ती या जीवघेण्या खेळाचा आनंद घेत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. काय आहे नेमकी ही घटना ? पाहुयात या विशेष रिपोर्टमधून.
मुलाला पाहून नेटकरी संतापले...
रस्त्यावर वाहनांची वर्दळ... लोकांची धावपळ... आणि अशातच सुसाट वेगाने धावणारी ही रिक्षा. ही दृश्यं पाहून तुम्हाला नक्कीच संताप आला असेल आणि काळजाचा ठोकाही चुकला असेल. पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात एका अल्पवयीन मुलाने चक्क रिक्षाचं स्टिअरिंग हातात घेतलं आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू केला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, हा मुलगा राजरोसपणे रिक्षा चालवतोय. पण त्याहून संतापजनक बाब म्हणजे, मागे बसलेली व्यक्ती त्या मुलाला रोखण्याऐवजी मज्जा पाहत बसली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या बेजबाबदारपणावर सडकून टीका केली आहे.
मोठा अपघात झाला तर कोण जबाबदार?
हा अल्पवयीन मुलगा नक्की कोण आहे ? आणि त्याच्या मागे बसलेली ती व्यक्ती रिक्षाचालक आहे की त्या मुलाचा नातेवाईक ? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, या गंभीर प्रकाराची दखल आरटीओ प्रशासनाने घेतली आहे. रिक्षाच्या नंबरवरून संबंधित वाहन मालकाचा शोध सुरू असून, त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भर गर्दीत हा प्रकार सुरू असताना पोलिसांनी याकडे कानाडोळा केला का ? असा सवाल विचारला जातोय. जर एखादा मोठा अपघात झाला असता, तर त्याला जबाबदार कोण असतं ? भविष्यात असे जीवघेणे स्टंट रोखण्यासाठी आता प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागणार हे मात्र नक्की.